Varun Chakravarthy Revealed That he was Nervous in IND vs NZ Match: वरूण चक्रवर्ती मिस्ट्री स्पिनर… २०२१ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये ज्या भारतीय खेळाडूला याच दुबईच्या मैदानावर न्यूझीलंडविरूद्ध एक विकेटही मिळाली नव्हती आणि टीम इंडियातून त्याला ड्रॉप करण्यात आलं होतं. पण त्याच वरूणने आज आपल्या मेहनतीने आणि उत्कृष्ट कामगिरीने भारतीय संघात पुनरागमन करत याच दुबईच्या मैदानावर २०२५ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध वनडे सामन्यात ५ विकेट्स घेतले आहेत. शेवटी मेहनतीचं फळ मिळतंच हे वरूणने दाखवून दिलं. न्यूझीलंडविरूद्ध भारताच्या विजयात ५ विकेट्स घेत वरूणने मोठी भूमिका बजावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतासाठी केवळ दुसरा वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना खेळताना या फिरकीपटूने पाच विकेट्स घेत अनेक मोठे विक्रम केले. साहजिकच सामनावीर पुरस्काराचा तोच मानकरी ठरला. पुरस्कार सोहळ्यात वरुणने खुलासा केला की तो सामन्यादरम्यान तो खूप नर्व्हस होता, पण यामागचं कारण काय होतं आणि त्याने कशी कामगिरी केली, जाणून घेऊया.

वरूण चक्रवर्तीचं सामन्यानंतर मोठं वक्तव्य

वरुण म्हणाला, “सुरुवातीच्या षटकांमध्ये मी नर्व्हस होतो. याचे कारण म्हणजे मी भारतासाठी खूप एकदिवसीय सामने खेळले नाहीत, पण जसजसा सामना पुढे सरकत गेला, तसतसे मला ठिक वाटू लागलं. विराट, रोहित, श्रेयस आणि हार्दिक माझ्याशी सातत्याने येऊन बोलत होते आणि याचा मला खूप फायदा झाला.”

न्यूझीलंडविरूद्धचा सामना तो खेळणार आहे हे त्याला कधी कळलं या प्रश्नावर तो म्हणाला, “मला याची माहिती सामन्याच्या आदल्या रात्रीच मिळाली होती. अर्थातच मी देशासाठी खेळण्यासाठी उत्सुक होतो, पण मी खूप नर्व्हस पण होतो.”

“दुबई इंटरनॅशनल स्टेडियमची ही खेळपट्टी फारशी टर्निंग पिच नव्हती. पण जर तुम्ही इथे योग्य भागात चेंडू टाकलात तर त्याचा फायदा होतो. आणि माझ्याबरोबरही असंच घडलं,” वरूणने त्याच्या कारकिर्दीतील दुसऱ्या वनडेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. यादरम्यान बोलताना तो पुढे म्हणाला, “कुलदीप, जड्डू आणि अक्षर यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली ते पाहता, हा एक उत्कृष्ट सांघिक प्रयत्न होता त्यामुळे आम्ही न्यूझीलंडला शानदार शैलीत हरवू शकलो.”

दुबईच्या संथ खेळपट्टीवर वरुणने भेदक गोलंदाजी करत किवी संघाची मधली फळी उद्ध्वस्त केली आणि त्यांना अवघ्या २०५ धावांवर सर्वबाद केले. वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीबाबत सर्वांना आधीच उत्सुकता होती कारण त्याने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत छाप पाडली होती. मात्र त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अद्याप संधी मिळाली नव्हती. न्यूझीलंडविरुद्धचा सामना या स्पर्धेतील त्याचा पहिला सामना होता आणि या मिस्ट्री स्पिनरने या सामन्यात कहर केला.

वरूण चक्रवर्तीने या सामन्यात विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना वेळीच बाद करत भारताला सामन्यात कायम ठेवले. वरूणने विल यंगला क्लीन बोल्ड करत आपल्या दुसऱ्याच षटकात विकेट मिळवली. यानंतर त्याने ग्लेन फिलिप्स आणि मायकल ब्रेसवेल यांना पायतचीत केले. तर अखेरच्या षटकांमध्ये मोठमोठे फटके मारणाऱ्या मिचेल सँटरनला क्लीन बोल्ड करत संघाचा विजय निश्चित केला. तर भारताविरूद्ध पाच विकेट्स घेणाऱ्या मॅट हेन्रीला विराटकरवी झेलबाद करत पाचवी विकेट मिळवली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun chakravarthy statement after fifer said i was nervous but virat rohit shreyas hardik were talking to me that helped ind vs nz bdg