फिरकीला अनुकूल अशा मीरपूरच्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजला बांगलादेशने दिलेलं २१४ धावांचं लक्ष्य मानवलं नाही. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला ६ चेंडूत ५ धावा हव्या होत्या. शेवटच्या चेंडूवर वेस्ट इंडिजला ३ धावांची आवश्यकता होती. खार पेरीने दोन धावा घेतल्या आणि सामना टाय झाला. ८१३ सामने खेळल्यानंतर पहिल्यांदाच बांगलादेश पुरुष संघाचा सामना टाय झाला आहे. अटीतटीच्या सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने बाजी मारली. वेस्ट इंडिजने हा सामना जिंकत मालिकेत १-१ बरोबरी केली आहे. तिसरा आणि अंतिम सामना गुरुवारी होणार आहे.
सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने १० धावा केल्या. मुस्ताफिझूरने शेरफन रुदरफोर्डला बाद करत चांगली सुरुवात केली मात्र शे होप आणि ब्रँडन किंग यांनी चौकाराच्या साह्याने १० धावा वसूल केल्या.
अकेल हुसेनचा पहिला चेंडू वाईड देण्यात आला. दुसऱ्या चेंडूवर सौम्या सरकार आणि हुसेन यांनी दोन धावा घेतल्या आणि हा चेंडू नोबॉल असल्याचं स्पष्ट झालं. फ्री हिटवर सौम्या सरकारला एकच धाव घेता आली. पुढचा चेंडू निर्धाव पडला. तिसऱ्या चेंडूवर सैफने एक धावा घेतली. चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा सौम्या सरकारचा प्रयत्न गुदकेश मोटीच्या हातात जाऊन विसावला. पाचवा चेंडू लेगबाय देण्यात आला. शेवटच्या चेंडूवर बांगलादेशला चौकार हवा होता. हा चेंडू वाईड देण्यात आला. तीन धावांची आवश्यकता असताना बांगलादेशच्या सैफ हसनला केवळ एकच धाव करता आली आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी जल्लोष केला.
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भरवशाचा ब्रँडन किंग भोपळाही फोडू शकला नाही. अलेक अथेन्झ आणि केसी कार्टी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ चेंडूत ५१ धावांची भागीदारी केली. रिषाद हुसेनन अथेन्झला बाद करत ही जोडी फोडली. अकीम ऑगस्ट १७ धावा करून बाद झाला. रिषादनेच कार्टीलाही तंबूत परतावलं. त्याने ३५ धावांची खेळी केली. धडाकेबाज फटकेबाजीसाठी प्रसिद्ध शेरफन रुदरफोर्ड ७ धावा करून बाद झाला. गुदकेश मोटीने १५ धावा करत प्रतिकार केला पण रिषादने त्यालाही माघारी धाडलं. चांगल्या तंत्रानिशी खेळू शकणारा रॉस्टन चेस ५ धावा करून परतला. शे होप आणि जस्टीन ग्रीव्ह्ज यांनी ६५ चेंडूत ४४ धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा जिवंत राखल्या. ग्रीव्ह्ज बाद झाल्यानंतर होपने अकेल हुसेनला साथीशी घेत ३४ धावांची भागीदारी रचली. सैफ हसनने अकेल हुसेनला बाद करत ही जोडी फोडली. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला पाच धावांची आवश्यकता होती. सैफने दोन चेंडू निर्धाव टाकले. तिसऱ्या चेंडूवर हुसेनने एक धाव काढली. चौथ्या चेंडूवर होपने एक धाव मिळवली. पाचव्या चेंडूवर हुसेन त्रिफळाचीत झाला. शेवटच्या चेंडूवर खाया पॅरीला तीन धावा करता आल्या नाहीत. पॅरी-होप जोडीने दोन धावा काढल्या पण जिंकण्यासाठी तेवढं पुरेसं ठरलं नाही. बांगलादेशतर्फे रिषादने ३ तर नसूम अहमद, तन्वीर इस्लाम यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
तत्पूर्वी सबकुछ फिरकी आक्रमणाच्या बळावर वेस्ट इंडिजने बांगलादेशला २१३ धावांतच रोखलं. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सगळी षटकं फक्त फिरकीपटूंनी टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. वेस्ट इंडिजतर्फे अकेल हुसेन, रॉस्टन चेस, खाया पॅरी, गुदकेश मोटी आणि अलेक अथेन्झ यांनीच आक्रमणाची धुरा सांभाळली. मोटीने ३ तर हुसेन आणि अथेन्झ यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.