आंतरराष्ट्रीय तिरंदाजी महासंघाने (एफआयटीए) भारतीय तिरंदाजी असोसिएशनच्या (एएआय) निवडणुकीला मान्यता दिली असून त्यामुळे एएआयचे मनोबल उंचावले आहे. सरकारच्या क्रीडा आचारसंहितेनुसार वय आणि कालमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्रीडा मंत्रालयाने एएआयची मान्यता रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता. एफआयटीएचे सचिव टॉम डिएले यांनी एएआयचे अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये ‘आंतरराष्ट्रीय महासंघाची एएआयच्या निवडणूक प्रक्रियेला मान्यता असून नवनिर्वाचित समितीलाही आमची मान्यता आहे’ असे लिहिले आहे.
एएआयचे सचिव अनिल कमिनेनी यांनी पत्राद्वारे क्रीडा मंत्रालयाने निवडणुकीनंतर असोसिएशनची मान्यता रद्द केल्याचे कळविले होते. पण आंतरराष्ट्रीय महासंघाची नवनिर्वाचित समितीला मान्यता असल्याचे आम्ही त्यांना कळविले आहे, असे डॅनियल यांनी सांगितले.