Pomegranate Benefits: अनेकांना आवडणाऱ्या डाळिंब या फळामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून त्याचे सेवन हृदय आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. परंतु, बाजारातून डाळिंब आणल्यानंतर काही दिवसात ते लगेच खराब होऊ लागतात किंवा सुकू लागतात. अशा परिस्थितीत डाळिंब फ्रिजमध्ये ठेवणे योग्य ठरू शकते का? जर तुमच्या डोक्यातदेखील हा प्रश्न असेल तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगू

डाळिंब फ्रिजमध्ये ठेवता येईल का?

जर तुम्ही बाजारातून डाळिंब खरेदी करत असाल आणि ते पिकले असेल तर तुम्ही ते रूम टेम्प्रेचरवर साठवू शकता. अनेकदा उष्णतेमुळे डाळिंब सामान्य तापमानात लवकर सुकू शकते, त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवणे फायदेशीर ठरू शकते. फ्रिजमध्ये ठेवल्याने ते आठवडाभर फ्रेश राहू शकते.

डाळिंबाचे दाणे कसे स्टोअर करायचे?

डाळिंबाचे दाणे काढणे खूप कंटाळवाणे काम आहे, त्यामुळे अनेक जण ते आधीपासूनच सोलून काढतात. परंतु, डाळिंबाचे दाणे जास्त दिवस साठवण्यासाठी तुम्ही हवाबंद कंटेनर वापरू शकता. हे दाणे तुम्ही ४-५ दिवसांसाठी फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता.

डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय?

डाळिंब आतड्यांसाठी एक वरदान आहे. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते आणि सर्दी व संसर्गापासूनही दूर ठेवते. अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असलेले डाळिंब त्वचेवरही जादू करते आणि ती चमकवते. त्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने ते आतड्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. डाळिंब शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्सनी भरलेले असून डाळिंब शरीराचे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते.