जिल्ह्यात गेल्या आठवडय़ात पडलेल्या दमदार पावसाने मध्यम, लघु व साठवण तलावांपकी १९ प्रकल्प भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. पकी १८ लघु प्रकल्प व भूम तालुक्यातील बाणगंगा मध्यम प्रकल्प पूर्ण भरून वाहात आहे.
मागील दोन महिने पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली होती. काही भागात पावसाळ्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. सरकारनेही जिल्ह्यात टंचाईसदृश स्थितीवर मात करण्यासाठी दुष्काळी उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. मात्र, मागील आठवडय़ापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे बहुतांश सिंचन प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा निर्माण झाला. तसेच पिकांनाही जीवदान मिळाल्याने शेतकरी सुखावला.
भूम तालुक्यातील वाकवड तलाव, कुंथलगिरी लघु प्रकल्प, बाणगंगा मध्यम प्रकल्प, नांदगाव तलाव, उस्मानाबाद तालुक्यातील आळणी तलाव क्रमांक १, राघुचीवाडी लघु प्रकल्प, उमरगा तालुक्यातील कोळसूर लघु प्रकल्प, चिंचोली पि., तलमोडवाडी, भिकार सांगवी, दगडधानोरा, मुरळी, कळंब तालुक्यातील मलकापूर साठवण तलाव, तुळजापूर तालुक्यातील इटकळ व पळस निलेगाव येथील लघु प्रकल्प आदी १९ प्रकल्प पूर्ण भरून प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहिले. या मुळे या प्रकल्पांवर अवलंबून परिसरातील गावे व शेतीचा पाणीप्रश्न काहीअंशी मिटला आहे.