स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली आणि सुमारे ६०० वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आलेल्या अपसिंगा (ता. तुळजापूर) येथील प्राचीन डौलदार वेशीची पुरातत्त्व खात्याकडून वर्षांनुवष्रे परवड होत आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इतर वास्तूंप्रमाणे अपसिंग्याच्या वेशीची पुरातत्त्व खात्याकडे अद्याप नोंदच नाही. परिणामी, पुरातन वास्तूंच्या डागडुजीसाठी मिळणाऱ्या शासकीय अनुदानापासून आजवर ही वेस वंचित राहिली आहे.
राज्यात अनेक रहस्यमय प्राचीन वास्तुशिल्पे अस्तित्वात आहेत. अशाच रहस्यमय वास्तुशिल्पाची प्रतिकृती म्हणून अपसिंगा येथील ऐतिहासिक वेशीकडे पाहण्यात येते. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली ही वेस तीनमजली अशी उत्तुंग आहे. प्रत्येक मजल्यामध्ये एखाद्या महालाप्रमाणे रचना करण्यात आलेली आहे. वेशीचा एक मजला जमिनीखाली असून, तो सुमारे ३०० वर्षांपूर्वी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. जहागिरी कारभाराची धुरा सांभाळलेल्या अपसिंगा येथील जहागिरदाराच्या अधिपत्याखाली १४व्या शतकामध्ये या वेशीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. परंडा येथील किल्ला, तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मशीद व अपसिंगा येथील वेस या एकाच शिल्पकाराने निर्माण केलेल्या कलाकृती असल्याचे सांगितले जाते.
तळमजल्यावर दोन्ही बाजूंना दिवाणखान्याप्रमाणे बसण्याची प्रशस्त व्यवस्था तर तिसऱ्या मजल्यावर एखाद्या महालातील कलाकृतीप्रमाणे रचना करण्यात आली आहे. वेशीचे संपूर्ण बांधकाम चुना व तांबूस रंगाचा दगड वापरून करण्यात आले आहे. बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगडदेखील आकाराने मोठे, लांबलचक, रेखीव आणि कोरीव आहेत. अपसिंग्यात आलेला पाहुणा व नवखी व्यक्ती वेस पाहिल्याशिवाय परत जात नाही. प्राचीन काळातील उत्कृष्ट बांधकामातील असलेली कला आजच्या मजलोमजली बांधकामांना लाजविणारी आहे. स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेली व अपसिंगा गावाचे प्रवेशद्वार असलेली ही पुरातन वेस इतिहासाची साक्ष देत आजही ताठ मानेने उभी आहे.
बांधकाम होऊन अनेक शतके लोटल्याने पावसाळा सुरू होताच वेशीला छतावरून गळती लागायची. पूर्वजांनी निर्माण केलेला हा ठेवा चिरंतन काळापर्यंत टिकून राहावा, यासाठी ग्रामपंचायतीने २०११-१२मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेच्या बक्षीस रकमेतून चार लाख रुपये खर्चून वेशीची डागडुजी करवून घेतली. रंगरंगोटी, सुशोभीकरण, दिवाबत्ती आदी कामे केल्याने वेस आता आकर्षक दिसत आहे. मात्र अद्याप उर्वरित आवश्यक कामे निधीअभावी खोळंबली असल्याचे सरपंच रामदास गोरे यांनी सांगितले. यासाठी शासनाचा निधी मिळायला हवा. वेशीची दैना तात्पुरत्या स्वरूपात फिटली खरे, परंतु ही वास्तू दीर्घकाळ टिकावी, यासाठी पुरातत्त्व विभागाकडे नोंद होऊन त्यासाठी विकास निधी मिळणे गरजेचे आहे.