महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कारप्राप्त जुनोनी या उस्मानाबाद तालुक्यातील गावांमध्ये अवैध गावठी दारू व्यवसायाने चांगलेच बस्तान बसविले आहे. गावात शंभर टक्के दारुबंदी करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ जानेवारी २०१३ पासून करीत आहेत. यासाठी ग्रामपंचायतीने पाच वेळा ठराव घेत ते संबंधित पोलीस ठाण्याला सादर केले आहेत. परंतु पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांचा पुरता अपेक्षाभंग झाला आहे. ग्रामस्थांची इच्छा असतानाही अवैध दारूची विक्री बंद होत नसल्याने महिलादेखील हवालदिल आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी हे दोन हजारांच्या आसपास लोकवस्ती असलेले गाव. तंटामुक्तीच्या चांगल्या कार्याबद्दल या योजनेचा पुरस्कारही गावाला मिळालेला आहे. ग्रामस्थांची संपूर्ण मदार, शेती व अन्य व्यवसाय तसेच मजुरीवर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून या गावांमध्ये अवैध गावठी दारुविक्रीचा धंदा चांगलाच फोफावला आहे. गावांमध्ये चालणाऱ्या बेकायदा दारुविक्रीमुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. तसेच मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याचे प्रकारही तळिरामांकडून नेहमीच घडतात.
त्यामुळे गावातील संपूर्ण दारुविक्री बंद करावी, अशा प्रकारचा ठराव २६ जानेवारी २०१३ रोजी जुनोनी ग्रामपंचायतीने घेतला होता. तो ग्रामीण पोलीस ठाण्याला सादरही केला. परंतु आठ महिन्यानंतरही ठोस कार्यवाही झालीच नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने २ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा दारुबंदीचा ठराव घेतला. त्याचाही परिणाम पोलीस प्रशासनावर झाला नाही. त्यावर ग्रामपंचायतीने वेळोवेळी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत आणखी तीन असे पाच ठराव घेतले. तरीही आजपर्यंत गावात दारुविक्री थांबलेली नाही. शंभर टक्के दारुबंदीची चळवळ ग्रामस्थांकडून सुरू केली असली, तरी त्याला पोलीस प्रशासनाचे बळ मिळत नसल्याने दारुबंदीचे स्वप्न अजूनही साकार झालेले नाही. महिलांच्या छळाचे प्रमाण वाढलेल्या या गावातील ग्रामस्थांनी आठ वेळा निवेदनेही दिली. पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक पोलीस प्रशासनाच्या बेदखल कारभाराबद्दल संताप व्यक्त करीत आहेत. पोलिसांचाच अवैध दारुविक्रेत्यांना वरदहस्त असल्याचा आरोप जुनोनी ग्रामस्थांतून होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2014 रोजी प्रकाशित
दारुबंदीसाठी जुनोनी ग्रामस्थांचे आठ ठराव
महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कारप्राप्त जुनोनी या उस्मानाबाद तालुक्यातील गावांमध्ये अवैध गावठी दारू व्यवसायाने चांगलेच बस्तान बसविले आहे. गावात शंभर टक्के दारुबंदी करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ जानेवारी २०१३ पासून करीत आहेत.
First published on: 17-06-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 resolution for alcohol ban in junoni village