मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी (संगमेश्वर) येथे खासगी बसला झालेल्या अपघातात २० जण जखमी झाले असून, त्यापैकी ३ गंभीर आहेत. हा अपघात आज पहाटे सुमारे ५ वा. झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातग्रस्त बसमधील बहुतेक प्रवासी मुंबई-बोरिवलीतील असल्याचे समजते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘नीता ट्रॅव्हल्स’ कंपनीची एमएच ०४ जी ५९६० ही आराम बस रात्री मुंबईहून गोव्याकडे निघाली होती. आज पहाटे धामणी येथे ही बस आली असता ती रस्त्याच्या कडेला कलंडली आणि १० फूट खोल खड्डय़ात पडली. या अपघातात बसमधील २० प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी शामल मनोहर परब (बोरिवली- मुंबई), रेवणसिद्ध रामचंद्र कल्ले (रा. मंगळवेढा) व जितेंद्र भारती (म्हापसा-गोवा) यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच धामणी परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना खबर दिली. तसेच बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. शामल परब ही महिला बसमध्येच अडकून पडली होती. तिला बाहेर काढण्यात आले. तिच्या कमरेला जबर दुखापत झाली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, तर अन्य एक महिला अंकिता मोरे ही टायरमध्ये अडकून पडली होती. सदर अपघातग्रस्त बस संजय दुर्योधन पवार हा चालवीत होता. नाताळ सणानिमित्त ही सर्व मंडळी गोव्याला जात होती, असे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident to private bus near dhamni