तटरक्षक दलाच्या येथील तळासाठी मंजूर करण्यात आलेली ‘आयसीजीएस सी-४०२’ ही आधुनिक गस्ती नौका दाखल झाली आहे.  येथील भगवती बंदरामध्ये जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी या नौकेचे स्वागत केले. तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक ए. के. हर्बेला, कमांडर एस. महेंद्र सिंग, २ महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिटचे कमांडर अमितकुमार संन्याल, जिल्हा पोलीस अधीक्षक दीपक पांडे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमधून राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या हस्ते गेल्या १२ एप्रिल रोजी या नौकेचे जलावतरण करण्यात आले होते. आधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात आलेल्या या नौकेची लांबी ३० मीटर असून कमाल वेग ४५ नॉटिकल मैल राहणार आहे. कॅप्टन डेप्युटी कमांडंट जी. मणिकुमार यांच्यासह ११ कर्मचारी या नौकेवर आहेत. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील ३६ गस्ती नौकांच्या योजनेतील ही दुसरी नौका असून पहिली नौका गुजरातमधील पोरबंदर येथे तैनात करण्यात आली आहे.
उपमहानिरीक्षक हर्बेला याप्रसंगी बोलताना म्हणाले की, सागरी सुरक्षेचे नियोजन आणि त्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने लहान तळ विकसित करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. तसेच त्यांचे सक्षमीकरण करण्याचीही योजना आहे. येथील तटरक्षक दलाला मिळालेल्या या आधुनिक नौकेमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा जास्त मजबूत होईल, असा विश्वास आहे.
रत्नागिरीच्या सागरी क्षेत्रातील वाढती वाहतूक लक्षात घेता सागरी सुरक्षा, शोध आणि बचाव कार्याच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत तटरक्षक दलाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन जिल्हाधिकारी जाधव यांनी दिले.