मोहोपाडा येथे मुख्यालय असलेल्या सिद्धिविनायक नागरी सहकारी बँकेत सुमारे १० कोटी रुपयांचा अपहार करून ठेवीदार व खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या संचालकांसह ३३ जणांविरुद्ध तसेच बँकेला सदोष संगणकप्रणाली पुरविणारे मेगा सॉफ्ट इन्फर्मेशन सिस्टीम, डोंबिवली यांच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सॉफ्टवेअर डाटाबेसचा बेकायदेशीरपणे वापर, एण्ट्रीबुकमध्ये फेरफार, खोटय़ा एफडीवर कर्ज, तारण नसलेले कर्ज, अधिकाराव्यतिरिक्त दिलेले कर्ज, लोकांची कोणतीही माहिती न ठेवता कर्ज देणे अशा पद्धतीने बँकेत व्यवहार करून नऊ कोटी ८५ लाख एक हजार ९२६ रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. तसेच मेगा सॉफ्ट इन्फर्मेशन सिस्टीम या कंपनीने सदोष संगणकप्रणाली जाणीवपूर्वक बँकेला देऊन अपहारास मदत केली, अशी तक्रार एस. एस. गोएंका अ‍ॅण्ड असोसिएट चार्टर्ड अकाऊन्टचे आशीष  जालान यांनी रसायनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार याप्रकरणी राकेश प्रकाश तेरसे, सुदाम शंकर भोईर, बाळकृष्ण पांडुरंग पाटील, सुप्रिया सत्यजीत भगत, तुळशीराम धोंडू पाटील, जनार्दन रघुनाथ कर्णुक, जनार्दन नारायण जाधव, विजयसिंग सदाशिव निंबाळकर, अनंत राजाराम भोईर, अनंत नरहर सुगवेकर, विष्णू धर्मा भगत, सीताराम गोपाळ भुईकोट, संतोष रघुनाथ खालापूरकर, गणपत हरिश्चंद्र थोरवे, अलका शांताराम पाटील, सुमन संतोष भोईर, प्रमोद शांताराम चौधरी, संजय सदाशिव देशमुख, एकनाथ आत्माराम पाटील, सुभाष पाटील, दीपा सिंग, शरद दत्तात्रय म्हसे, अनिता रघुनाथ पाटील, आदिनाथ बापू देसाई, शबीर ए. कादिर लोरे, संजय चंदू मुंढे, प्रफुल्ल महादेव ओटावकर, सुनील मनोहर लोंढे, नूतन प्रमोद कदम, गणपत बापू वाघमारे, अभय कमलाकर पाटील, नागनाथ सदाशिव भोसले, सचिन हरिश्चंद्र भालेकर व मेगा सॉफ्ट इन्फर्मेशन सिस्टीम कंपनीविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्यापि कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. एस. जाधव अधिक तपास करीत आहेत.