जगातील विविध प्रकारच्या रोगांवर उपचारासाठी आधुनिक पद्धतीने संशोधन केलेल्या औषधांची गरज असली तरी अनेकदा औषधे खपवण्यासाठी संबंधित कंपन्यांकडून वापरल्या जाणाऱ्या बाजारपेठीय क्लृप्त्या ही चिंताजनक बाब आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी केले.
वेंगुर्ले येथील किरात ट्रस्ट आणि डॉ. विवेक रेडकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे ‘आरोग्याचे पोस्ट मार्टेम व आजोळचा जन्म’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा, तर सुभाष भांडारकर यांच्या ‘आठवणीतील सुभाषिते भाग-२’ या पुस्तकांचे प्रकाशन कुबेर यांच्या हस्ते झाले. या वेळी विविध बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांच्या बाजारपेठ काबीज करण्यासाठी चालणाऱ्या क्लृप्त्यांची उदाहरणे देऊन कुबेर म्हणाले की, आज डॉक्टर आहेत म्हणून औषधे आहेत की औषधे आहेत म्हणून डॉक्टर आहेत, की दोन्ही आहेत म्हणून आजारी लोक आहेत, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण औषध कंपन्यांच्या प्रयोगांसाठी माणसांचा वापर केला गेल्याचे दिसून आले आहे. तसेच बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांची गरज म्हणून काही आजार निर्माण केले जातात आणि त्यावर मक्तेदारी पद्धतीने औषधांची विक्री होते, असे अनुभवाला आले आहे. त्यामुळे काही वेळा तर, वैद्यक शास्त्राच्या प्रगतीचा इतिहास म्हणजे माणसे मारण्याच्या कलेचा इतिहास आहे, असे अतिशय खेदाने म्हणावे लागते.
किरात ट्रस्टतर्फे सीमा मराठे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विवेक रेडकर यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली. नगराध्यक्ष नम्रता कुबल यांनी याप्रसंगी बोलताना वेंगुल्र्यात दर्जेदार वैद्यकीय सुविधांची गरज असल्याचे मत नोंदवले. याच कार्यक्रमात दैनिक ‘तरुण भारत’चे आवृत्तीप्रमुख विजय शेट्टी, आयबीएन लोकमतचे विभागीयप्रमुख दिनेश केळुसकर आणि वरवडे येथील उद्योजक नामदेव धुरी यांचा कुबेर यांच्या हस्ते कॉ. श्रीकांत लाड स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शशांक मराठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमापूर्वी मालवणी कविताकार दादा मडकईकर यांचे कविता गायन झाले.