महाराष्ट्रात उच्च शिक्षण मराठीतून व्हावे की इंग्रजीतून, या मुद्दय़ावर मोठमोठय़ा चर्चा झडत असताना मॉरिशसमध्ये मात्र मराठी भाषेचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न होत असून मराठी भाषेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मॉरिशसमधील विद्यापीठामध्ये प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव यांनी सोमवारी दिली.
मॉरिशसमधील महात्मा गांधी स्कूल ऑफ इंडियन लॅंग्वेजेसतर्फे  मराठी भाषेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निर्मिती मंडळावर डॉ. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मॉरिशसची प्रमुख भाषा ही फ्रेंच आहे. परंतु तेथील एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के मूळ भारतीय वंशाचे नागरिक आहेत आणि १८ टक्के मराठी नागरिक आहेत. त्यामुळे मॉरिशस सरकार मराठी भाषेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत डॉ. जाधव म्हणाले, ‘‘पाच विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे शिक्षण घेण्याची इच्छा असली, तरी त्यांच्यासाठीही अभ्यासक्रम चालवण्याची तेथील व्यवस्थापनाची तयारी आहे.
मराठी भाषेचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मॉरिशस येथील विद्यार्थ्यांना आतापर्यंत दूरशिक्षणावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे आता मॉरिशसमधील विद्यापीठांमध्येच मराठी भाषेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय मॉरिशस सरकारने घेतला आहे. तेथील विद्यार्थ्यांसाठी मराठीचा अभ्यासक्रम तयार करताना मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा इतिहास, परंपरा, सांस्कृतिक रचना आणि भाषेचे सविस्तर विश्लेषण अशा घटकांचा समावेश करण्यात आला आहे. मराठी लोककला, लोककथा अशा घटकांचाही समावेश करण्यात आला आहे.’’    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for marathi sylabus in mauritius university