आरोंदा जेटी प्रकल्पास कायमस्वरूपी स्थगिती द्यावी, अशी मागणी आरोंदा बचाव संघर्ष समितीने मोर्चाद्वारे प्रांताधिकारी श्रीमती सुषमा सातपुते यांना निवेदन देऊन केली. या मागणीस राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेने पाठिंबा देऊन मोर्चात सहभाग दर्शविला. आरोंदा भटवण्यातील लोकांचा भरणा या मोर्चात अधिक होता. सुमारे २०० आंदोलकांत महिलांची संख्या अधिक होती, असे पोलिसांनी सांगितले.
शासनाच्या धोरणाशी पूर्ण विसंगत व बेकायदेशीररीत्या चाललेल्या खनिज जेटीच्या कामास त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी करणाऱ्या मोर्चास संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, प्रा. गोपाळ दुखंडे, शिवसेनेचे रुपेश राऊळ, विष्णू परब, उपसंघटक भाई देऊलकर, माजी तालुका प्रमुख उत्तम वाडकर, पर्यावरणप्रेमी प्रा. सुरेश गवस, मनसे उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल केसरकर, महेश पांचाळ, तालुकाप्रमुख राजू कासकर, महेश सावंत, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष आनारेजीन लोबो, महिला तालुका अध्यक्ष भारती देसाई, दिलीप सोनुर्लेकर, काँग्रेसचे विजय कुडतरकर, अनंतराव मुळीक, शिवसेनाचे शैलेश तावडे, विलास सावंत, शब्बीर मणियार, राष्ट्रवादी सरपंच उल्हास गावडे, विष्णू नाईक, विद्याधर नाईक, रामचंद्र कोरगावकर, गोविंद केरकर, मनोहर आरोंदेकर, भिकाजी पेडणेकर, बाबी गावडे, व्यंकटेश नाईक, दिलीप नाईक व मान्यवर उपस्थित होते.
प्रा. गोपाळ दुखंडे म्हणाले, कोकणात गेली दहा वर्षे आंदोलने करून शेतकरी, मच्छीमार त्रस्त झाले आहेत. सरकारविरोधात असंतोष आहे. पर्यावरण अहवाल आरोंदाप्रश्नी टाळला जात आहे. कायदा पाळा, अन्यथा संघर्ष निर्माण केला जाईल. जिल्ह्य़ात संघर्षांची ताकद निर्माण व्हायला पाहिजे, आरोंदा जेटीला विरोध करणारी एकजूट ठेवा, असे आवाहन करत सरकारला सळो की पळो करण्याची ताकद आपणात आहे, असे प्रा. दुखंडे म्हणाले.
राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष सौ. आनारेजीन लोबो यांनी कणकवलीच्या लोकांनी आरोंद्यात येऊन विकास व रोजगाराच्या गप्पा मारू नयेत. जेटीमुळे गावावर अन्याय होत असल्याने सर्वानी पेटून उठा व एकजूट दाखवा, असे आवाहन केले.
शिवसेना उपसंघटक भाई देऊलकर यांनी, एकजुटीने विजय मिळेल. त्यासाठी जेटीला विरोध करण्याची ताकद वाढवून संघर्ष करू या. शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले. मनसे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल केसरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुडतरकर, प्रा. सुरेश गवस आदींनी मार्गदर्शन केले. संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनीही जेटी नकोची विस्तृत मांडणी केली.
प्रांताधिकारी श्रीमती सुषमा सातपुते यांना समितीने निवेदन दिले जेव्हा तहसीलदार विकास पाटील उपस्थित होते. या वेळी जेटी नकोची कारणे शिरोडकर यांनी मांडली होती. बागायती नष्ट होईल, मच्छीमारी संपेल, मच्छीमार कुटुंबे आर्थिक टंचाईत येतील, लाखो टन खनिज माती नेण्यात येणार असल्याने प्रदूषण होईल. पिण्याच्या पाण्यावर परिणाम होईल.
आरोंदा पर्यटनस्थळ असून हाऊसबोटही कुठे तरी नेण्यात आली आहे. जेटीच्या राक्षसामुळे कांदळवन व मत्स्यबीजावर परिणाम होईल. कांदळवनाची कत्तल म्हणजे मनुष्यवधच आहे, असे अविनाश शिरोडकर यांनी प्रांताधिकाऱ्य़ांच्या समोर मांडणी करताना सांगितले.
आज जेटी आकार घेत आहे तेथे समर्थक सांगत असलेली जेटी नव्हती. तेथे भातशेती होती. चुकीची जागा जेटी समर्थक दाखवत आहेत. त्याचे योग्य सर्वेक्षण व्हावे, असे अविनाश शिरोडकर यांनी सुचविले. ‘वरली’ म्हणजेच दगडाचे ढीग बंधाराला लागून असतात ते या भागात दिसतात. शेतकरी, बागायतदार, मच्छीमारांच्या संरक्षणासाठी आरोंदा जेटी रद्द करावी, अशी मागणी शिरोडकर यांनी निवेदनाद्वारे केली, त्यात सविस्तरपणे त्यांनी माहिती दिली आहे.