अण्णासाहेब जावळे यांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प येथील शंभू नारायण पार्कच्या मैदानात छावा संघटनेचे संस्थापक दिवंगत अण्णासाहेब जावळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय सभेत करण्यात आला.
या प्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांनी जावळे यांच्याविषयीच्या आठवणी मांडल्या. व्यासपीठावर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, छावा संघटनेचे विलास पांगारकर, छावा युवा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष करण गायकर, हंसराज वडगुले नगरसेवक संजय साबळे, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते. दत्ता गायकवाड यांनी जावळे यांच्या निधनाने मराठी समाजाचे नुकसान झाल्याचे नमूद केले. गायकवाड यांनी १९८२ मध्ये जावळे यांच्यासोबत काढलेल्या मोर्चाची आठवण सांगितली. पांगारकर यांनी छावा संघटनेच्या प्रत्येकाने अण्णासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे, असे सांगितले. गायकर यांनी अण्णासाहेबांचा वसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. गणेश कदम यांनी मराठा आरक्षणासाठी झटणे हीच त्यांच्या प्रति श्रद्धांजली ठरेल, अशी भावना व्यक्त केली. जिजाऊ ब्रिगेडच्या माधवी पाटील यांसह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. पसायदानाने दिवंगत अण्णासाहेब जावळे यांच्या शोकसभेची सांगता झाली.