नाशिकपासून ३५ किलोमीटर अंतरावरील पेठ परिसरात शुक्रवारी पहाटे २.८ ‘रिश्टर स्केल’चा भूकंपाचा धक्का बसला. त्यात कोणतीही हानी झाली नसली तरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री भूकंपाचे काही धक्के बसले असले तरी ते अतिशय सौम्य स्वरूपाचे असल्याचे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) भूकंपमापन केंद्राने म्हटले आहे.
जिल्ह्य़ात कळवण तालुक्यातील दळवट आणि पेठ परिसराचा भूकंपप्रवण क्षेत्रात समावेश आहे. दळवट भागात तर नेहमी भूकंपाचे धक्के बसत असतात. पेठ तालुक्यात काही वर्षांपूर्वी अशीच स्थिती होती. साधारणत: दीड वर्ष हा भाग काहीसा शांत राहिला असताना गुरुवारची मध्यरात्र व शुक्रवारी पहाटे परिसराला भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरात घबराट पसरली. मध्यरात्री पेठ जवळच्या गोंदे, जोगमोडी, इनामबारी, मांगोणे, करंजाळी, भायगाव आदी अतिदुर्गम गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास त्याची तीव्रता अधिक होती. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या भूकंपमापन केंद्रात त्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेल्याची माहिती या विभागाचे प्रमुख ए. एस. महिरे यांनी दिली. मध्यरात्री बसलेले धक्के २.२ रिश्टर स्केलचे होते. भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल यंत्रणेने कर्मचाऱ्यांना उपरोक्त गावात पाठवून स्थितीची पाहणी केल्याचे पेठच्या तहसीलदार एस. डी. मोहिते यांनी सांगितले.