अवघ्या आठ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असून निवडणुकीच्या गडबडीतून बाहेर पडलेल्या नागरिकांनी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी विक्रेत्यांनी सवलतींची खैरात चालवली आहे. बोनस हाती पडताच कामगार सहज खरेदीला बाहेर पडण्याच्या तयारीत आहे.
सर्वाना भावणारा दीपोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठ पूर्णपणे सजली असून ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठय़ा प्रमाणात उभारले आहेत. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोठी खरेदी आणि विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे दीपावली. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर शहरात मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असते. सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असल्याने खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. विविध प्रकारचे तयार कपडे, बालगोपालांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, अत्तर, फटाके, आकाशकंदील, पूजेचे साहित्य, विविध रंगांच्या रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढत आहे.
रेडिमेड फराळाला मागणी
नोव्हेंबरच्या दुस-या आठवडय़ात दिवाळी आल्याने गृहिणींना फराळ तयार करण्यासाठी वेळ कमी मिळत आहे. त्यामुळे यंदा रेडिमेड फराळावर ताव मारणा-यांसाठी गृहउद्योग फराळाच्या तयारीला वेग आला आहे. यंदा दोन लाख किलो फराळ नागरिकांसाठी बनविण्यात येणार असून, जवळपास चार कोटींची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. पदार्थाच्या किमती गेल्या वर्षीइतक्याच आहेत. शिवाय यंदा रेडिमेड फराळाला मागणी वाढणार आहे.
या उद्योगातून महिलांना उत्तम रोजगार मिळतो. या फराळाच्या निमित्ताने शेकडो महिलांना तीनशे रुपयांची रोजंदारी मिळते आहे. मजुरांच्या कमतरतेने उत्पादकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महिला इतर उद्योगांमध्ये नोक-या करीत असल्याने दिवाळीमध्ये मध्यमवर्गीयांचा फराळ विकत घेण्याकडे मोठय़ा प्रमाणात कल आहे. त्यामुळे बाजारपेठेत असे तयार फराळ विक्रीच्या स्टॉल्सवर महिलांची गर्दी दिसत असून घराघरात तयार फराळाची पाकिटे दिसणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2015 रोजी प्रकाशित
दिवाळी खरेदीने बाजारपेठ फुलली
बोनस हाती पडताच कामगार खरेदीला बाहेर
Written by अपर्णा देगावकर

First published on: 06-11-2015 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enthusiasm for diwali shopping in market