भारतातील प्राणी आणि वनस्पतींच्या १३२ प्रजातींचा समावेश ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झव्र्हेशन फॉर नेचर’ (आययूसीएन)ने जाहीर केलेल्या ‘रेड लिस्ट’मध्ये करण्यात आला असल्याने त्यांची नामशेष होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा गंभीर इशारा मिळाला आहे. माळढोकसह अनेक पक्षी प्रजातींना असलेला धोका गेल्या वर्षभरापासून आणखी वाढला असून, एकूण १५ पक्षी काही काळानंतर दिसणार नाहीत, अशी स्थिती उद्भवू शकते.
माळढोक, सायबेरियन क्रौंच आणि नदीकाठी वावरणारी टिटवी या तीन पक्ष्यांची अतिदुर्मीळ प्रजातीत नोंदणी करण्यात आली आहे. माळढोक हा महाराष्ट्रातही आढळणारा पक्षी असून, भारतातील माळढोकची संख्या २५०-३०० एवढीच राहिलेली आहे. हा पक्षी आता आययूसीएनच्या ‘रेड लिस्ट’मध्ये आल्याने माळढोक संवर्धनासाठी राज्य सरकारला युद्धपातळीवर उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
भारतात उभयचरांच्या १८ प्रजाती, माशांच्या १४, तर सस्तन प्राण्यांच्या १० प्रजाती दुर्मीळ होत आहेत. केरळमध्ये आढळणारी कोंकणी दुधी ही वनस्पती जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. महासीर माशाची प्रचंड प्रमाणात खाण्यासाठी शिकार झाल्याने हा मासादेखील रेड लिस्टमध्ये आला आहे. महासीर मासा महाराष्ट्रातील तापी, नर्मदा, गोदावरी आणि प्राणहिता नदीत एकेकाळी मोठय़ा संख्येने आढळत होता. पाणमांजरांचे महासीर हे प्रमुख भक्ष आहे. मानवानेही महासीर माशाची प्रचंड प्रमाणावर शिकार केल्याने तो आययूसीएनच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. मोठे मासे आणि व्हेल यांचे भक्ष असलेली जलचर झिंग्यांची प्रजातीही आता संपण्याच्या मार्गावर आहे.
जगभरातील जैववैविध्याच्या संतुलनाचा कणा असलेल्या ७० हजार २९४ पैकी २० हजार ९३४ विविध पक्षी, प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून, पर्यावरण संतुलनाला यामुळे मोठा धक्का बसणार आहे. अलीकडेच आययूसीएनने ४ हजार ८०७ प्रजातींचा यादीत समावेश केला. आययूसीएनला अद्यापही १० हजार ४९७ प्रजातींची पूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही. भारतातील सात पक्षीप्रजाती जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपल्या आहेत. बहिरी ससाणा हा शिकारी पक्षीही धोक्यात आहे.
झिंगे भारतात मोठय़ा आवडीने खाल्ले जातात. महाराष्ट्रातही नदीकाठी आढळणारे झिंगे मारून त्यांचे मांस विकले जाते. ट्राऊट मासा हा ब्रिटिशांनी भारतात आणला होता. त्याचे आता उत्तेरकडील हिमालय, सिक्कीम आणि जम्मू व काश्मीर या राज्यांमध्ये मत्स्यपालन केले जाते. हा मासा मोठय़ा प्रमाणात विकला जातो. समुद्री प्राण्यांच्या झपाटय़ाने कमी होत चाललेल्या संख्येबद्दल आययूसीएनने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. २८ टक्के जलचर धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील १० टक्के जलचरांना माणसापासून धोका आहे. पाण्याचे प्रदूषण, वसाहतींच्या उभारणीसाठी समुद्रात होणारे भराव यामुळे प्रजातींची संख्या कमी होत चालली आहे. मत्सालयांमध्ये ठेवण्यासाठी अनेक प्रजाती जिंवत पकडल्या जातात, परंतु त्यांचे प्रजनन होत नाही. त्यामुळेही त्यांची संख्या मर्यादित राहिली आहे. समुद्र साखळीतील कोन स्नेलचा (समुद्री गोगलगाय) वेदनाशामक औषधांमध्ये वापर केला जात असल्याने त्यांचीही शिकार केली जाते.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2013 रोजी प्रकाशित
भारतातील १३२ प्रजातींचे अस्तित्व धोक्यात
भारतातील प्राणी आणि वनस्पतींच्या १३२ प्रजातींचा समावेश ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झव्र्हेशन फॉर नेचर’ (आययूसीएन)ने जाहीर केलेल्या ‘रेड लिस्ट’मध्ये करण्यात आला असल्याने त्यांची नामशेष होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा गंभीर इशारा मिळाला आहे. माळढोकसह अनेक पक्षी प्रजातींना असलेला धोका गेल्या वर्षभरापासून आणखी वाढला असून, एकूण १५ पक्षी काही काळानंतर दिसणार नाहीत, अशी स्थिती उद्भवू शकते.

First published on: 04-07-2013 at 04:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Existence of 132 genus in danger in india