खालापूर ते उर्से टोलमधील अंतर तीस मिनिटांत पार करणाऱ्या वाहनांवर कारवाई
वेग मर्यादेचे पालन न करणे, लेनकटिंग, बेदरकारपणे वाहन चालविणे अशी सतत कारवाई महामार्ग पोलिसांकडून सुरू असते. या कारवाईसाठी महिन्यात एक ते दोन वेळा ‘स्पेशल ड्राइव्ह’ घेतला जाते. त्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर अधिक कारवाई करण्यावर भर असतो. नुकत्याच झालेल्या स्पेशल ड्राइव्हमध्ये एक हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
स्पीडगनला मर्यादा येत असल्यामुळे खालापूर ते उर्से टोलनाक्यामधील अंतर तीस मिनिटांच्या आत पूर्ण करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. या दोन टोलमधील अंतर पन्नास किलोमीटर आहे. शासनाने या द्रुतगती मार्गावर साधारण वेगमर्यादा ताशी ८० किलोमीटर नेमून दिलेली आहे. त्यामुळे हे अंतर पार करण्यासाठी ३७ ते ४० मिनिटं लागतात. पण जी वाहने हे अंतर तीस मिनिटांत पार करतील त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
महामार्ग पोलिसांच्या दोन विभागात प्रत्येकी तीन अधिकारी आणि तीस कर्मचारी मंजूर आहेत. त्यापैकी दोन्ही विभागामध्ये प्रत्येकी एक अधिकारी व दहा ते बारा कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. महामार्ग पोलिसांना स्वत:चे मनुष्यबळ नाही. त्यामुळे पुणे ग्रामीणकडून प्रतिनियुक्तीवर पात्र व इच्छुक पोलिसांना घेतले जाते. रिक्त जागेसाठी आमचा पाठपुरवा सुरू असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.
‘आरएफआयडी’ची सक्ती हवी!
ल्लअतिवेगात निघालेल्या वाहनाचा क्रमांक टिपून त्याची माहिती केंद्रीय यंत्रणेस देण्यासाठी ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (आरएफआयडी) यंत्रणेचा वापर करता येईल. मोटर कारमध्ये ‘आरएफआयडी’ बसवले की सीसीटीव्ही कॅमेरे आणि तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनाचा क्रमांक आणि सर्व माहिती आपोआप केंद्रीय यंत्रणेत नोंदवली जाईल. परदेशांत महामार्गावर अशीच यंत्रणा असते. त्यामुळे शेकडो वाहने जात असताना कॅमेऱ्यातून नंबर प्लेट टिपली गेली नाही वा नंबर वाचता आला नाही अशा त्रुटींवर मात करता येईल. ‘आरएफआयडी’ यंत्रणा फार महागही नाही. शंभर-दीडशे रुपयांत ती वाहनावर बसवता येते. पण परिवहन विभागाने, पोलिसांनी त्यासाठी इच्छाशक्ती दाखवायला हवी. मुळात सरकारी यंत्रणेतूनच अशा गोष्टींना विरोध असल्याची चर्चा ऐकायला येते. ‘आरएफआयडी’ यंत्रणा बसवली की गाडय़ा कोठून कुठे गेल्या याची सारी माहिती नोंदली जाते. राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेतील अनेकांना ते नको आहे. कारण अनेकदा गाडय़ांमधून काळय़ा पैशाची आवक-जावक चालते. निवडणूक काळात अनेकदा अशा गाडय़ा पकडल्याची उदाहरणे आहेत. पण त्यांची संख्या कमी व ‘निसटलेल्या’ गाडय़ांची संख्या अधिक असते. तशात ‘आरएफआयडी’ यंत्रणा सक्तीची झाली की बेकायदेशीर व्यवहारांच्या ‘मार्गात अडथळा’ निर्माण होईल, अशी भीती यंत्रणेला वाटते, अशी कुजबूज ऐकू येते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे एक चांगली आणि प्रभावी उपाययोजना प्रत्यक्षात येण्यात अडचणी येत आहेत.
वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांना थांबवून ठेवा – बदामी
* द्रुतगती महामार्गावर प्रति तास ८० किलोमीटर अशी वेगमर्यादा असली तरी बहुतांश वाहने ही सरासरी प्रति तास १०० ते ११० किलोमीटर या वेगाने सुसाट जात असतात. त्यातूनच अनेक जण ताशी १२०-१३० किलोमीटर हा वेग गाठतात. म्हणजेच वेगमर्यादेपेक्षा दीडपट अधिक वेगाने ही वाहने जात असतात. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास दंड करण्याची तरतूद आहे. पण हल्ली दोन-पाचशे रुपयांचा दंड कारवाल्यांना काहीच वाटत नाही. त्यामुळे केवळ आर्थिक दंड करून भागणार नाही. अशा वाहनचालकांना आर्थिक दंड व त्याचबरोबर पकडून काही तास बसवून ठेवणे अशी शिक्षा व्हायला हवी. दोन-पाच तास, वा अर्धा दिवस बसवून ठेवले की त्यातून मानसिक शिक्षा होऊन पुढच्या काळात अशा रीतीने वेगमर्यादेचे उल्लंघन करण्याची वृत्ती नियंत्रणात येऊ शकते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने वेगावर लक्ष ठेवून अशा वाहनचालकांना आर्थिक दंड व शिक्षा यातून चाप बसवता येईल आणि त्यातून अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते – वाहतूकतज्ज्ञ सुधीर बदामी.
फसवे उपाय नकोत – दातार