ज्येष्ठ चित्रकार, अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि राज्याचे माजी कला संचालक मुरलीधर नांगरे (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे. आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी प्रमोद नांगरे आणि अभिनव कला महाविद्यालयातील शिक्षक नितीन नांगरे हे त्यांचे चिरंजीव होत. अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुरलीधर नांगरे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ शिल्पकार दिनकार थोपटे, चित्रकार मुरली लाहोटी, श्याम भूतकर, रावसाहेब गुरव, दिलीप कदम, बुवा शेटे, विवेक खटावकर, सुभाष पवार, प्राचार्य गजराज चव्हाण, कला संचालनालयाचे निरीक्षक दिलीप बोर्ले उपस्थित होते. अभिनव कला महाविद्यालयातून ‘पेंटिंग’ विषयात जी. डी.आर्ट संपादन केल्यानंतर मुरलीधर नांगरे हे तेथेच असिस्टंट लेक्चरर म्हणून रुजू झाले.
लेक्चरर, विभागप्रमुख आणि प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर १९९४ ते १९९९ या कालावधीत ते राज्याचे कला संचालक होते. शाईचा टाक याच्या साहाय्याने त्यांनी चितारलेली कृष्ण-धवल पेंटिंग्ज ही त्यांनी चित्रकलेला दिलेली देणगी आहे. निसर्गचित्रे, रेखाचित्रे, व्यक्तिचित्रे यामध्ये हातखंडा असलेल्या मुरलीधर नांगरे यांनी वास्तववादी चित्रांपासून ते अमूर्त शैलीची चित्रे असे सर्व कलाप्रकार यशस्वीपणे हाताळले. त्यांच्या चित्रांना राज्य पुरस्कारांसह बॉम्बे आर्ट सोसायटीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘त्रिनाले’ या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनामध्ये नांगरे यांच्या चित्रांचा सहभाग होता.