अल्पवयीन मुलीला घरात डांबून तिला वाममार्गाला लावण्याच्या जिल्ह्यातील प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून वडिलांनीच ३० हजार रुपयांत मुलीची विक्री केल्याचा गुन्हा शहर पोलिसांनी नोंदविला आहे.
शहराजवळील नगाव शिवारात एका अल्पवयीन मुलीला डांबून तिला वाममार्गाला लावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी बेबीबाई चौधरी या मुख्य सूत्रधारासह अन्य काही जणांविरुद्ध याआधीच गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला तिचे वडील रावसाहेब मुंगसे यांनीच विकले असल्याचा गौप्यस्फोट अ‍ॅड. सुशिल हिरे यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीत केल्याने न्यायाधीश एम. एम. अग्रवाल यांनी मुंगसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. अ‍ॅड. हिरे यांनी दिलेल्या तक्रारीत मुंगसे यांच्या प्रकृतीचीही माहिती दिली आहे. मुंगसे यांची किडनी निकामी झाल्याने त्यांना दररोज एक हजार ५० रुपये औषधोपचारासाठी लागतात. या खर्चामुळेच त्यांनी ३० हजार रुपयांत मुलीला बेबीबाईकडे सोपविल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी मुंगसे यांची पीडित मुलगी एका किराणा दुकानात काम करीत होती. बेबीबाईने स्वत: मुलीला ३० हजारांत विकत घेतल्याचा जबाब पोलिसांना दिला त्या वेळी मुलीचे वडीलही उपस्थित होते, अशी माहितीही अ‍ॅड. हिरे यांनी तक्रारीत दिली आहे.
या प्रकरणात बेबीबाई चौधरी, गणेश चौधरी, सपना पाटील, पूजा पाटील व पूजा कातकाडे यांना अटक करण्यात आली आहे. सचिन अग्रवाल, अशोक बाफना आणि विजय टाटिया या संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रारंभी ११ जणांवर संशय व्यक्त करून पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केल्यानंतर त्यातील एक संशयित संजय बोरसेने काही दिवसांपूर्वी गळफास घेतला. या प्रकरणात आपली नाहक बदनामी करण्यात आली. त्यामुळेच आपण आत्महत्या करीत आहोत, असे पत्र बोरसे यांनी लिहून ठेवले होते. याचा आधार घेत आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने बोरसेची पत्नी मंगला यांनी पोलिसात फिर्याद दिली. पीडित मुलीचे वडील रावसाहेब मुंगसे (रा. नांदुर शिंगोटे, जि. नाशिक) यांनी त्यांच्या मुलीला बेबीबाईकडे ३० हजारांत विकले. तिला अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यातून आपले पती संजय बोरसे यांची बदनामी झाली, असे या फिर्यादीत मंगला बोरसे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या फिर्यादीच्या आधारावर मुंगसेविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने आता बेबीबाई चौधरी कुंटणखाना प्रकरण वेगळ्या वळणावर पोचले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father sold daughter for 30 thousand