दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी संशोधन क्षेत्रात मौल्यवान कामगिरी केली असून येथे मस्त्यबीज उत्पादन केंद्र सुरू करण्यासाठी तातडीने मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली.
विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक, संशोधक आणि अधिकाऱ्यांसमवेत पवार यांनी नुकतीच बैठक घेतली. या वेळी कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी भातशेती, फळबाग लागवड, मत्स्यशेती इत्यादी क्षेत्रांत विद्यापीठाने केलेल्या उपयोजित संशोधनाची माहिती दिली. पवार यांनी विद्यापीठाच्या योगदानाचे कौतुक करून मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील संशोधनावर विद्यापीठाने भर द्यावा, असे सुचवले आणि त्यासाठी मत्स्यबीज उत्पादन केंद्र मंजूर करण्याचीही घोषणा केली.
या प्रसंगी बोलताना पवार म्हणाले की, मासेमारीच्या क्षेत्रात केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र पिछाडीवर आहे. कोकणात मत्स्य व्यवसाय विकसित करण्यासाठी चांगली संधी आहे. येथील मासेमारीचे क्षेत्र वाढवण्यासाठी उपाययोजनांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मासे निर्यात करण्यासाठी मत्स्य व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
कोकणातील फळ पिकांच्या परिस्थितीबाबत बोलताना पवार म्हणाले की, जैव तंत्रज्ञान विषयातील संशोधनाला गती दिल्यास उत्पादन वाढीबरोबरच हवामान बदलांमुळे फळांचे होणारे नुकसान टळू शकेल. राज्यात फळ प्रक्रियेची मोठय़ा प्रमाणात व्यवस्था नसल्यामुळे कोकणातील प्रक्रिया उद्योग सरासरी दोन महिने चालतात. आंबा प्रक्रिया करणारे केंद्र वर्षभर चालवण्यासाठी इतर भागांतून फळे आणून ते पूर्ण क्षमतेने चालवण्याची गरज आहे. तसेच मालाच्या साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देताना जागतिक बाजारपेठेवर लक्ष ठेवण्याची आवश्यकताही पवार यांनी व्यक्त केली.
अशा प्रकारे फळ प्रक्रिया आणि मच्छीविषयक संशोधनाला चालना देण्यासाठी इंडियन सेंटर फॉर अॅग्रीकल्चरल रिसर्च या संस्थेच्या माध्यमातून सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर करण्यात येईल, तसेच मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा पवार यांनी केली. विद्यापीठात आधुनिक सभागृह बांधण्यासाठीही अर्थसाहाय्याचे आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
दापोलीच्या कृषी विद्यापीठात मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारणार
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी संशोधन क्षेत्रात मौल्यवान कामगिरी केली असून येथे मस्त्यबीज उत्पादन केंद्र सुरू करण्यासाठी तातडीने मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली.
First published on: 15-01-2013 at 02:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fish seed center will be open in dapoli farming collage