हजारो आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या वनखात्याला नक्षलवाद्यांनी सध्या लक्ष्य केले असून बुधवारी मध्यरात्री सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयाची जाळपोळ करून टाटा सुमो व महेंद्र मॅक्स ही दोन वाहनेही जाळली. यात वनमजूरांचा संपूर्ण रेकॉर्ड जळून राख झालेला आहे. स्थानिक आदिवासींना रोजगार मिळू नये आणि नाईलाजाने ही सर्व मंडळी नक्षळ चळवळीत सक्रीय व्हावी म्हणून नक्षलवाद्यांनी वन कार्यालयांना लक्ष्य केल्याची माहिती आहे. दरम्यान, या दोन महिन्यात नक्षलवाद्यांनी पाच वन कार्यालये जाळली.
गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी जाळपोळीतून हिंसाचार घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागात नक्षलविरोधी अभियान अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नक्षलवाद्यांची शिबिरे उध्वस्त करून त्यांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात तसेच दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी आता मध्यरात्रीनंतर या भागातील वन कार्यालय जाळणे सुरू केले आहे. काल, बुधवारी मध्यरात्री २५ ते३० नक्षलवाद्यांनी झिंगानूर गावातील वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनमजूर व कर्मचाऱ्यांना चांगलेच धमकावले व या सर्वाना बाहेर काढून या कार्यालयाला आग लावली. तसेच कार्यालय परिसरातील टाटा सुमो आणि महेंद्र मॅक्स या गाडय़ांची तोडफोड करून त्यांनाही आग लावली. दरम्यान, कार्यालय आगीत जळून भस्मतात होत नाही तोवर नक्षलवादी तेथेच उभे होते. यावेळी नक्षलवाद्यांनी वनखाते व पोलिस दलात भरती व्हाल तर याद राखा, अशी धमकी गावकऱ्यांना दिली. तसेच वन व पोलिस भरतीला विरोध करणारी पत्रकेही वितरित केली. यानंतर ते जंगलात पसार झाले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
या घटनेची माहिती मिळताच सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी, तसेच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत या आगीत कार्यालयातील महत्वाचे दस्तऐवज, फर्निचर, कागदपत्रे व इतर साहित्य जळून राख झाले होते. गेल्या दोन महिन्यात नक्षलवाद्यांनी मालेवाडा, गट्टा जांबिया, पेरिमिली, देचलीपेठा आणि झिंगानूर, अशी पाच वन कार्यालये जाळली. विशेष म्हणजे, या पाचही ठिकाणी सर्वप्रथम नक्षलवाद्यांनी वन मजूरांचा रेकॉर्ड नाहीसा केला आहे. कारण, या भागातील हजारो आदिवासी मजूरांना काम मिळू नये आणि हे सर्व मजूर नक्षल चळवळीत सहभागी व्हावेत म्हणूनच सध्या नक्षलवाद्यांनी वनखात्याला टार्गेट केल्याची माहिती आहे. वनखात्याला टार्गेट करा, अशा सूचना नक्षली नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच दलम कमांडरला दिलेल्या होत्या. गेल्या दोन महिन्यातील घटना बघितल्या तर हे अधिक स्पष्टपणे समोर आले आहे. जिल्ह्य़ातील आदिवासींना वन मजूरांच्या स्वरूपाने सर्वाधिक रोजगाराची संधी वनखात्यात मिळते. त्याचा परिणाम नक्षल चळवळीत सहभागी होणाऱ्या आदिवासींची संख्या कमालीची रोडावली आहे. येथील आदिवासी आता नक्षल चळवळ नको, असा सूर एकमुखी लावत असल्याने चळवळीसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी वनखात्याला टार्गेट केले असून ते आदिवासींच्या मुळावर उठल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, या जाळपोळीत वनखात्याची लाखोची हानी झाली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, बुधवारी रात्री झिंगानूर कार्यालय नक्षल्यांनी जाळल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2015 रोजी प्रकाशित
नक्षलवाद्यांच्या रडारवर आता वनखाते, जाळपोळसत्र सुरूच
गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी जाळपोळीतून हिंसाचार घडवून आणण्यास सुरुवात केली आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 18-09-2015 at 05:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest department on naxal radar