गौरी भावे हिने येथील एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाचा ‘मिस् एसएमआरके’ मुकूट मिळविला. नताशा साळवे व निकिता कनोजिया या उपविजेत्या ठरल्या.येथील परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, माजी प्राचार्या सुनंदा गोसावी, उपप्राचार्या डॉ. मनीषा राणे, प्रा. साधना देशमुख, प्रायोजक शीतल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मिस् एसएमआरके स्पर्धेसाठी झालेल्या विविध फेऱ्यांमधून अंतिम फेरीत गौरी, नताशा व निकिता यांनी मजल मारली. त्यातून परीक्षकांनी गौरीच्या बाजूने कौल दिला. परीक्षक म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नलिनी बागूल व तनुजा महाजन यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनींनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, लावणी, गौळण, जोगवा, एकपात्री अभिनय, टॅलेण्ट शो असे विविध कलाविष्कार सादर केले. त्यासाठी ईश्वर जगताप यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.