दुष्काळात १५ लाख रुपये खर्चून बाग जगविली. उत्पन्न शून्य. दुसऱ्या वर्षी काहीतरी पदरात पडेल म्हणून पुन्हा १४ लाख रुपये खर्चून कौडगाव येथील सचिन पांडुरंग चव्हाण यांनी द्राक्षबाग तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. गारपिटीच्या तडाख्यातून ते वाचले. मात्र रविवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसाने त्यांची संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली. सलग दोन वष्रे झालेला घाटा आणि डोक्यावर ५० लाखांचे कर्ज अशी त्यांची विवंचना आहे.
उस्मानाबाद-बार्शी रस्त्यावर शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या कौडगाव येथे चव्हाण यांची १० एकर द्राक्षबाग आहे. ते स्वत: व घरातील पाच व्यक्ती मिळून बागेची जोपासना करतात. चव्हाण यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा द्राक्षबाग हेच एकमेव साधन आहे. गतवर्षी पडलेल्या दुष्काळामुळे बागेतून त्यांना काहीच उत्पन्न मिळू शकले नाही. मात्र बाग जिवंत ठेवण्यासाठी सुमारे १५ लाख रुपये पाण्यात घालवावे लागले. भविष्यात अवर्षणाचा तडाखा बसू नये, यासाठी त्यांनी १० लाख रुपये खर्चून शेततळे घेतले. त्या शेततळ्याच्या पाण्यावर बाग जोपासली. यंदा पाऊस वेळेवर आला. फवारण्या वेळेवर झाल्या. पुन्हा लाखो रुपये बागेत ओतले. बागेला फळही चांगले आले. दोन वर्षांच्या शुक्लकाष्ट निघून जाईल, डोक्यावरील कर्ज फिटून हातात चांगली रक्कम उरेल या स्वप्नात असलेल्या चव्हाण यांच्या आशेवर अवकाळी पावसाने पाणी फिरविले आहे. गारपिटीच्या तडाख्यातून बाग वाचली. मात्र फळाने लगडलेली बाग रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यात कोलमडून गेली. बघता बघता होत्याचे नव्हते झाले. वादळाने केवळ क्षणार्धातच त्यांची साडेतीन एकर क्षेत्रावरील बाग मातीत मिसळली आहे.  द्राक्षाचे मणी गळाल्याने मातीवर त्याचे अंथरूण झाले आहे.
द्राक्षबाग हेच एकमेव कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या चव्हाण यांना निसर्गाच्या अवकृपेचा जबर फटका बसला आहे. वादळी वारे आणि अवकाळी पावसात द्राक्षबागेचे वाटोळे झाल्याने त्यांच्यापुढे भविष्यात बागेची उभारणी कशी करायची याची चिंता आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सुमारे ५० लाख रुपये कर्जाचा डोंगर डोक्यावर असलेल्या चव्हाण यांनी या अवकाळी पावसामुळे आमच्या पाठीचा कणा मोडला असून, जगण्याचे साधन असलेल्या बागेला पुढील काळात जोपासायचे असेल तर पुन्हा लाखो रुपये लागतील. ते आणण्यासाठी पूर्वीचे कर्ज फेडणे गरजेचे आहे. पण त्यासाठी पैसा आणायचा कुठून, असेही चव्हाण विचारतात.
मागील १२ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रबी व  फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून महसूल प्रशासनाने ६५ हजार ९४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. आता केंद्रीय पथक लवकरच जिल्ह्यातील परिस्थितीची पाहाणी करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.  उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, परंडा आणि कळंब या तालुक्यातील गावांना मोठय़ा प्रमाणात पाऊस आणि गारपिटीचा  फटका बसलेला आहे. अनेक ठिकाणी काढलेला कांदा शिवारात भिजल्याने सडून जात आहे. तर काढणीला आलेली ज्वारी आणि कडबा काळा पडला आहे.