सुसाट कारच्या धडकेने एकजण ठार, तर पाचजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास लातूरमध्ये घडली.
पीव्हीआर टॉकीज चौक ते बार्शी रोड या रस्त्याच्या समांतर असणा-या रस्त्यावरून सुसाट वेगाने मोटार चालविणा-या शिवाजी धुमाळ याने रस्त्यात येईल त्याला धडक दिली. या धडकेत नितीन बरसे (वय २५) हा जागीच ठार झाला, तर बालाजी ज्ञानोबा जगताप, अविनाश बळीराम कांबळे, काशिनाथ दत्तू कांबळे, पुंडलिक विठ्ठल कांबळे हे चौघेजण व एक लहान बालिका जखमी झाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व पोलीस उपाधीक्षक तिरुपती काकडे यांनी भेट दिली. पोलिसांनी मोटारचालक शिवाजी धुमाळ यास रात्रीच ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
(संग्रहित छायाचित्र)