माणूस जर स्वत:शी प्रामाणिक असेल तर तो मोठा होतो, असे मत ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी व्यक्त केले. ते अलिबाग तालुक्यातील नागाव इथे गुड बाय २०१२ या कार्यक्रमात बोलत होते. कलावंताची कला भलेही सादरीकरणाची असेल, पण तो स्वत:शी प्रामाणिक असणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.
सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी नागावच्या समुद्रकिनाऱ्यावर अनिशा रिसॉर्टमध्ये पाडगावकरांच्या काव्यमैफलीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात निवेदक भाऊ मराठे यांनी पाडगावकरांची मुलाखत घेतली. दैनिक कृषीवलचे संपादक संजय आवटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व डॉ. अविनाश लोखंडे यांनी सर्वाचे आभार मानले. पाडगावकरांनी आपल्या कवितांमागच्या अनेक आठवणींना या वेळी उजाळा दिला. आपल्या खास शैलीत त्यांनी कविताही सादर केल्या. वय झाले असले तरी आवाज थकला नाही आणि कवितेवरचे प्रेम माझे अजून संपले नाही, असे सांगत त्यांनी आपल्या गाजलेल्या कविता सादर केल्या.
आपल्या काव्यलेखनाला ज्येष्ठ साहित्यिक बा. भ. बोरकर आणि कुसुमाग्रजांनी दिलेल्या प्रोत्साहनाचे किस्सेदेखील त्यांनी या वेळी सांगितले. माझ्या कविता पाहिल्यावर आता मला लेखन थांबवायला हरकत नसल्याची प्रतिक्रिया कुसुमाग्रजांनी दिली होती. तर बा. भ. बोरकर यांनी हा मुलगा मराठी साहित्यात स्वत:ची नाममुद्रा उमटवेल, असे म्हटले होते, याचीही आठवण पाडगावकरांनी करून दिली.
‘चिऊताई चिऊताई दार उघड’सारखी कविता सादर करत त्यांनी लहान मुलांची मने जिंकली; तर भिंती पाडा, भेद गाडा, निराशा सोडा, कुढणे सोडा, मनाचे दरवाजे उघडा कविता सादर करत सध्याच्या ढासळणाऱ्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. कार्यक्रमाचा शेवट ‘सलाम’ या समकालीन वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या कवितेने केला. येणारे वर्ष सर्वाना सुख-समाधानाचे जावो, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर आणि गझलकार दिलीप पांढरपट्टे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.