शासनमान्य मुद्रांक छपाई बंद केल्यास मुद्रांक विक्रेता – दस्तलेखकावर अन्याय होऊन उपासमारी येणार असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २८ मार्च रोजी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय मुद्रांक विक्रेते यांनी घेतला आहे. सावंतवाडी तहसीलदार यांना या संदर्भातील निवेदन दस्तलेखनिक अभय गावडे, स्टॅम्पव्हेंडर एस. आर. पंडित, कीर्ती बोंद्रे, संध्या नेवगी, स्वप्निल धामापूरकर, सदाशिव परब, विलास डोंगरे व इम्तियाज खानापुरी आदींनी सादर केले आहे.  शासनमान्य मुद्रांक विक्रेता दस्तलेखक महासंघाने कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शासनमान्य मुद्रांक विक्रेता दस्तलेखक महासंघ, पुणे यांना विश्वासात घेण्यापूर्वीच मुद्रांक छपाई बंद करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे, असे या निवेदनात अध्यक्ष अशोक कुलकर्णी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सन १९६३ पूर्वीपासून मुद्रांक विक्री करण्याचे परवाने दिले असून राज्यात पाच हजाराहून अधिक लोक सदर व्यवसायावर अवलंबून आहेत. शासनाचे नियमित एजंट म्हणून काम करीत असल्याने त्यांना सरकारी किंवा खासगी क्षेत्रात नोकरी करण्यास बंदी आहे. मुद्रांक विक्री, दस्तलेखन, टायपिंग, झेरॉक्स अशा व्यवसायात लाखो लोक काम करीत असून शासनाच्या अशा निर्णयामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याने शासनाने सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत शासनाची महासंघ चर्चा करणार आहे. त्याशिवाय वाटाघाटीने अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल असे म्हटले आहे.