पालिकेच्या चर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी एकूण ५० आरोपींवर सोमवारी येथील न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशांसमोर सुरू असलेल्या खटल्यात वर्षभरापासून तुरुंगात असलेले, परंतु काही महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले आरोपी आ. सुरेश जैन यांच्या अर्जाविषयी २९ मे रोजी सुनावणी होणार आहे.
आरोप निश्चितीची प्रक्रिया दोन आठवडय़ांच्या आत पूर्ण करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे सरकार पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या घोटाळ्यातील १४ जणांनी आपली नावे आरोपींच्या यादीतून वगळण्यात यावीत, अशी विनंती करणारा अर्ज दिला होता. न्यायालयाने हा अर्ज याआधीच फेटाळून लावला होता. सर्वाना ‘समन्स’ बजावण्यात आले. आ. सुरेश जैन, प्रदीप रायसोनी, नाना वाणी व शिवचरण ढंढोरे यांना सोमवारी उपस्थित करण्याचे अधीक्षकांना वॉरंट बजावले होते. त्यावर जैन यांनी न्यायालयात होत असलेल्या कामकाजादरम्यान अनुपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली.
या अर्जावर न्यायालयाने सरकार पक्षाकडून खुलासा मागविला. हा खुलासा विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी सोमवारी सादर केला. जैन यांच्या अर्जावर युक्तिवाद होऊन २९ मे रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, पालकमंत्री देवकर यांच्यासह इतर सर्व आरोपींविरोधात दोषारोप निश्चित करण्यात आले. आ. जैन व लता भोईटे या दोघांव्यतिरिक्त देवकरांसह इतर सर्व आरोपी सोमवारी न्यायालयात उपस्थित राहिले.