सांगली : इस्लामपूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची घोषणा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केली. जगात सर्वांत मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवावी, असे आव्हानही विरोधकांना त्यांनी दिले.

पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक कार्यालयात झाली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी आमदार पाटील यांनी श्री. मलगुंडे यांच्या नावाची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत जल्लोष केला.आ. पाटील म्हणाले, श्री. मलगुंडे अजातशत्रू, मितभाषी आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना नगरपालिकेतील कामाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या वडिलांनी स्व. बापूंना मोठी साथ दिली आहे. आपल्या पक्षाने १९८५ साली ३१ पैकी २९ जागा जिंकून नगरपालिकेची सत्ता मिळविली होती. त्यानंतर आपण ३१ वर्षे या शहराच्या विकासाला मोठी चालना दिली. यामध्ये मलगुंडे यांचा वाटा मोठा आहे. येत्या ४-६ दिवसांत निवडणुका जाहीर होतील, कामाला लागा. गेल्या ९ वर्षांत या शहरात काय विकास झाला? चालू होती, ती कामे बंद कशी पडली? हे जनतेला सांगा, जनता निश्चित साथ देईल.

पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, पक्षाचे राज्य सरचिटणीस रवींद्र पवार यांनी मलगुंडे याच्या उमेदवारीस मान्यता दिली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुक कार्यकर्त्यांनी हे अर्ज घेऊन चार दिवसांत भरून द्यावेत. यावेळी माजी नगराध्यक्ष मलगुंडे यांनी उमेदवारीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संघटनेचा विश्वास सार्थ करू, असे मत व्यक्त केले.प्रा. शामराव पाटील, खंडेराव जाधव, पै. भगवान पाटील, सुरेंद्र पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, दादासाहेब पाटील, अरुणादेवी पाटील, धैर्यशिल पाटील, संदीप पाटील, पिरअली पुणेकर, अरुण कांबळे, सुस्मिता जाधव यांच्यासह युवक, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रारंभी माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांनी आभार मानले.