कानडी आणि मराठी भाषेचा हेल एकत्र घेऊन वावरणारी अस्सल अनुभूती म्हणजे ‘झिम पोरी झिम’ ही बालाजी मदन इंगळे यांची कादंबरी. भाषेचा नवा लहेजा आणि मनाचे भावनिक आंदोलन ‘झिम पोरी झिम’च्या माध्यमातून पडद्यावर अनुभवता येणार आहे. मागील चार वर्षांपासून साहित्य व प्रकाशन क्षेत्रात काम करणाऱ्या ‘काव्याग्रह’ने ‘झिम पोरी झिम’वर चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला आहे.
‘झिम पोरी झिम, कपाळाचं भिंग
भिंग गेलं फुटून, पोरी आल्या उठून’
खेळण्या बागडण्याच्या वयात खेडय़ापाडय़ातील पोरींच्या तोंडून एका लयीत हे शब्द अनेकदा ऐकायला येतात. अशी लय त्यांच्या आयुष्यात मात्र पुन्हा लाभेलच असे सांगता येत नाही. अगदी हाच धागा ‘झिम पोरी झिम’ या कादंबरीत बालाजी मदन इंगळे यांनी पकडला आहे. खेडय़ातल्या इतर मुलींप्रमाणेच या कादंबरीची ‘जना’ ही एक नायिका. शाळा शिकण्यासाठी तिचा सुरू असलेला आटापिटा, झिम्माफुगडीसारखे विविध खेळ खेळत शिक्षणाची, नोकरीची, सहजीवनाची, आदर्श कुटुंबाची स्वप्न रंगवणारी नायिका महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरची. परिस्थितीच्या रेटय़ात त्यांच्या आयुष्याचाच खेळ होऊन जातो. राख होऊन नष्ट होऊन जायचे की स्वत:मधील ठिणगी विझू न देता, धगधगत्या वास्तवाला तोंड द्यायचे, हा निर्णय बाईलाच घ्यावा लागतो, हे सांगणारे कथानक पडद्यावर अवतरणार आहे. म्हणूनच या कादंबरीस स्मिता पाटील साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, ललित साहित्य पुरस्कार, केशीराज व्यास साहित्य पुरस्कार व राज्य शासनाने उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून गौरविले.
२००९मध्ये औरंगाबादच्या जनशक्ती वाचक चळवळ या प्रकाशन संस्थेने ‘झिम पोरी झिम’चे प्रकाशन केले. अगदी कमी काळात या कादंबरीने मराठी रसिकांच्या मनात घर केले. ‘काव्याग्रह’चे विष्णू जोशी यांनी ‘झिम पोरी झिम’ पडद्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Aug 2014 रोजी प्रकाशित
बालाजी इंगळे यांची ‘झिम पोरी झिम’ मोठय़ा पडद्यावर
कानडी आणि मराठी भाषेचा हेल एकत्र घेऊन वावरणारी अस्सल अनुभूती म्हणजे ‘झिम पोरी झिम’ ही बालाजी मदन इंगळे यांची कादंबरी. भाषेचा नवा लहेजा आणि मनाचे भावनिक आंदोलन ‘झिम पोरी झिम’च्या माध्यमातून पडद्यावर अनुभवता येणार आहे.
First published on: 14-08-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhim pori jhim of balaji ingale film on screen