स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये व्यापाऱ्यांनी केलेल्या संपामुळे कोकणातील बाजारपेठांना मोठा फटका बसल्याचे चित्र पुढे आले आहे. राज्यातील महानगरांमध्ये गेल्या १ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या या नवीन करप्रणालीच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी संघटनेने आणि संबंधित शहराच्या पातळीवरील व्यापारी संघटनांनी बेमुदत बंदचे हत्यार उपसले. त्यामुळे प्रथमच दीर्घकाळ  राज्यातील किराणाभुसार आणि धान्याच्या बाजारपेठा बंद राहिल्या. कोकणातील शहरी, निमशहरी भागातील बाजारपेठांमध्ये मुख्यत्वे कोल्हापूर, मुंबई आणि पुण्याच्या बाजारपेठांमधून बहुतेक सर्व प्रकारच्या मालाचा पुरवठा होतो. संपकाळात हा पुरवठा मोठय़ा प्रमाणात खंडित होऊन अनेक पदार्थाची टंचाई निर्माण झाली. मसाल्याचे पदार्थ, ड्रायफ्रूटस् व विविध प्रकारच्या धान्यांचा या बाजारपेठांमधून पुरवठा थांबला. संप मिटल्यानंतरही मुंबईच्या बाजारपेठांमधून खोबरे, दालचिनीसह मसाल्याच्या पदार्थाचा पुरवठा अद्याप पूर्ववत होऊ शकलेला नाही.
 त्यामुळे पुण्याच्या घाऊक बाजारपेठेतून हे पदार्थ येथील व्यापारी उपलब्ध करून घेत आहेत. मुंबईतील व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबतचा तिढा आजच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर व्यापारी संघटनांच्या झालेल्या बैठकीत सुटला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व प्रकारच्या पुरवठय़ाबाबतची स्थिती पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे.
दूध व भाजीपाल्यासह सर्व प्रकारच्या अन्नधान्यासाठी कोकण घाटावरील बाजारपेठांवर पूर्णपणे अवलंबून असते. त्यामुळे एलबीटीच्या प्रश्नाशी थेट संबंध नसतानाही येथील व्यापारी आणि ग्राहकांना त्याची मोठय़ा प्रमाणात झळ सहन करावी लागली.