येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  स्वत: पुढाकार घेत शनिवारी तुळजाभवानी मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्षही सहभागी झाल्या.
    आषाढी एकादशीनिमित्त मंदिर संस्थानची जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी शनिवारी आढावा बठक घेतली. या दरम्यान मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी नारनवरे यांनी स्वत: झाडू हातात घेत मंदिर परिसर स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. या मोहिमेत नगराध्यक्षा विद्या गंगणे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, अमर परमेश्वर यांच्यासह नगरसेवक आणि पुजारीही सहभागी झाले होते.  
जिल्हाधिकारीपदाचा पदभार घेतल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता मोहीम सुरू करीत डॉ. नारनवरे यांनी स्वच्छता अभियान राबविण्याचे सर्व पालिका प्रशासनास आदेश दिले आहेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात, शहरात प्रशासनाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्याचा प्रयत्न झाला. या अभियानाची सुरुवात सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी तुळजाभवानी मातेच्या महाद्वारातूनच केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा तुळजाभवानी मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. शिवाय मंदिरासह परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी मंदिर प्रशासनाला दिल्या.
बांगडी विक्रेता महिलांनी घातला घेराव
तुळजाभवानी मंदिर परिसराच्या महाद्वारासमोरील भागात बांगडी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक महिलांनी मंदिर प्रशासनाची आढावा बठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी परत निघाले असता त्यांना घेराव घातला. आमच्या समस्या सोडवा, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी जिल्हाधिकारी नारनवरे यांनी नगराध्यक्ष विद्या गंगणे यांना बांगडी विक्री करणाऱ्या महिलांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.