महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळातील जालना व औरंगाबाद (ग्रामीण) या दोन विभागांमध्ये असलेल्या २ लाख ९५ हजार ४६३ कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे गेल्या मार्चअखेपर्यंत तब्बल ६ अब्ज ३० कोटी ३६ लाख ४६ हजार रुपये थकबाकी आहे. दरम्यान, महावितरणने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी योजनेत भाग घेतल्यास या शेतकऱ्यांनी वीजबिलात निम्मी सवलत मिळणार आहे.
औरंगाबाद (ग्रामीण) विभागात मार्चअखेर कृषीपंपांची ३ अब्ज ६७ कोटी ४१ लाख ६६ हजार रुपये, तर जालन्यात २ अब्ज ६२ कोटी ९४ लाख ८० हजार रुपये वीजबिलाची थकबाकी आहे. औरंगाबाद (ग्रामीण) विभागात कृषी संजीवनी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांनी निर्धारित वेळेत ५० टक्के, म्हणजे १ अब्ज ८३ कोटी ७० लाख ८३ हजार रुपये वीजबिल भरणा करणे आवश्यक आहे. या शेतकऱ्यांना व्याज व दंडाची एकूण ३ अब्ज ७२ कोटी ६६ लाख रुपये वीजबिल माफी मिळू शकते.
जालन्यात कृषीपंपांचे १ लाख २ हजार ३२१ ग्राहक आहेत. या सर्वानी कृषी संजीवनी योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना ५० टक्के, म्हणजे १ अब्ज ३१ कोटी ४७ लाख ४० हजार रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात ३१ ऑगस्टपर्यंत २० टक्के, तर २४ सप्टेंबपर्यंत दुसऱ्या टप्प्यात २० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. ३१ ऑक्टोबपर्यंत तिसऱ्या टप्प्यात १० टक्के रक्कम भरावी लागेल. त्यानंतर या शेतकऱ्यांची व्याज व दंडाची रक्कम माफ होऊ शकेल. यानंतर या शेतकऱ्यांना दंड व व्याजाची मिळून एकूण ३ अब्ज १२ कोटी ८३ लाख ५१ हजार रुपये वीजबिल माफी मिळू शकेल. कृषी संजीवनी योजनेंतर्गत ५० टक्के मूळ थकबाकी मासिक तीन हप्त्यांत भरण्याऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत एकरकमीही भरता येऊ शकेल.