विधिमंडळ अधिवेशन विशेष
गेल्या १० वर्षांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रात ०.१ टक्के वाढ झाल्याची काँग्रेसकडील कृषी खात्याने वार्षिक पाहणी अहवालात दिलेली माहिती ही ‘प्रिटिंग मिस्टेक’ असल्याचे सांगत राष्ट्रवादीने गुरुवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. राष्ट्रवादीकडेच असलेल्या जलसंपदा खात्याने प्रसिद्ध केलेली ‘श्वेतपत्रिका’ खोडून काढणारी ‘सत्यपत्रिका’ राष्ट्रवादीने काढली खरी; पण ही पत्रिका प्रसिद्ध होण्यापूर्वीच भाजपने ती फोडली व त्यातील माहिती कशी अर्धसत्य आहे हे दाखवून दिले.
श्वेतपत्रिका काढून सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सरकारने काहीसा दिलासा दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचनावरची सत्यपत्रिका प्रकाशित करीत श्वेतपत्रिकेच्या मुळवरच घाव घातला. आर्थिक पाहणी अहवालातील ०.१ टक्का सिंचनवाढीचा दावा ही प्रिंटींग मिस्टेक  असल्याचा दावाही राष्ट्रवाादीने आज केला. तसेच श्वेतपत्रिकेतील २५ टक्यापर्यंतची कामे व उपसा सिंचन योजना बंद करण्याच्या प्रस्तावासही विरोध केला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे ‘शक्तिस्थळ’ असून त्यांच्यावरील हल्ले यापुढे सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही पक्षाने दिला आहे.
 सिंचन घोटाळ्यावरून गेले काही महिने अडचणीत सापडलेल्या अजित पवार यांची आज राष्ट्रवादीने जोरदार पाठराखण केली. जलसंपदा विभागाने काढलेल्या श्वेतपत्रिकेच्या विरोधात विरोधी पक्षांनी काळी पत्रिका काढून सरकारचे दावे खोडून काढले. सिंचन क्षेत्रातील जाणकार व माजी मंत्री अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनीही काल पिवळी पत्रिका काढून श्वेतपत्रिकेतील दावे खोडून काढले होते. त्यातच या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी गेल्या चार दिवसांपासून विधिमंडळात राष्ट्रवादीला व त्यातही अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. या सर्व आरोपांना प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने सत्यपत्रिका प्रसिद्ध केली. आमदार शशिकांत शिंदे यांनी तयार केलेल्या या सत्यपत्रिकेचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, गृहमंत्री आर. आर. पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.
जलसंपदा विभागाने प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेत २५ टक्क्य़ांपेक्षा कमी काम झालेले प्रकल्प बंद करण्याचे तसेच उपसा सिंचन प्रकल्प बंद करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र स्वत:च्या खात्याच्या भूमिकेला छेद देणारा पवित्रा घेत राष्ट्रवादीने या धोरणाला विरोध दर्शविला. राज्यात सध्या तज्ज्ञांचे पेव फुटले असून प्रतिहेक्टरी जादा खर्च येतो म्हणून उपसा सिंचन योजनेला विरोध केला जात आहे. मात्र अवर्षणप्रवण भागासाठी या योजना आवश्यक असून ज्यांना राज्याचा भूगोल माहीत नाही, पाटबंधारे विभागाची माहिती नाही, तेच लोक याला विरोध करीत आहेत अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यावेळी केली.
भाजपने राष्ट्रवादीची पत्रिका आधीच फोडली
विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने सत्यपत्रिका दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते. मात्र ही सत्यपत्रिका भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आधीच लागली. भाजपने सकाळीच ही सत्यपत्रिका आणि त्यातील माहिती कशी अर्धसत्य आहे हे सांगत राष्ट्रवादीवर कुरघोडी केली.
श्वेतपत्रिकेबाबतच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज राष्ट्रवादीने सत्यपत्रिका काढली. ही सत्यपत्रिका खोडून काढण्यासाठी भाजपने अर्धसत्य पत्रिका लगेचच प्रसिद्ध केली. सिंचनाच्या घोटाळ्यावर गेल्या चार दिवसांत सभागृहात अजिबात चर्चा नाही, पण श्वेतपत्रिकांचा सुकाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.