हप्तेखोरीत नेहमीच चर्चेत असणाऱ्या पोलिसांनी आता महामार्गावर लूटमार सुरू केली आहे! गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा प्रत्यय येत आहे. सोलापूर-धुळे महामार्गावर हातात दंडुका घेऊन थांबत असलेल्या पोलिसांकडून ही लूट केली जात आहे. वाहनचालकांसह शेतकरीही यात भरडला जात आहे. एका तरुण शेतकऱ्याने वाहतूक पोलिसाचे या बाबत मोबाईल चित्रण केले. त्यामुळे पोलिसांची लूटमारी चव्हाटय़ावर आली.
उस्मानाबाद शहरापासून काही अंतरावर लाल दिव्याची गाडी घेऊन पोलीस कर्मचारी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची नेहमीच अडवणूक करतात. मात्र, तपासणीच्या नावाखाली सुरू असलेली अडवणूक चिरीमिरीपुरतीच असल्याचा पुरावा शेतकऱ्याने केलेल्या चित्रणातून समोर आला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील या शेतकऱ्याला पोलिसांच्या लाचखोरीचा प्रत्यय आला. आपण शेतकरी आहोत. शेतीचे साहित्य गाडीमध्ये घेऊन जात असल्याचे त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवत या तरुण शेतकऱ्याला गाडीची कागदपत्रे, चालकाचा परवाना, प्रदूषणविषयक शुल्क प्रमाणपत्र अशा ना-ना नियमांची आठवण करून दिली. ही कागदपत्रे दाखव नसता तेराशे रुपयांची पावती फाड, असा दम पोलिसाने भरला. पावती हवी नसेल, तर ३०० रुपये दे आणि प्रकरण मिटव. नाही तर कारवाई करावी लागेल. तीनशे रुपयांची मागणी करणाऱ्या पोलिसाने तडजोडीत शंभराची नोट हातामध्ये दुमडून घेतली व शेतकऱ्याची सुटका केली.
महामार्गावर लाल दिव्याची गाडी लावून सुरू असलेली पोलीस कर्मचाऱ्यांची ही लूट तरूण शेतकऱ्याने आपल्या कॅमेऱ्यात छुप्या रितीने कैद केली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2015 रोजी प्रकाशित
हप्तेखोरीवर वरकडी, महामार्गावर लूटसत्र!
हप्तेखोरीत नेहमीच चर्चेत असणाऱ्या पोलिसांनी आता महामार्गावर लूटमार सुरू केली आहे! गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा प्रत्यय येत आहे.

First published on: 27-06-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loot in warkadi highway