रायगडच्या पालकमंत्र्यांना स्वागताध्यक्ष केल्याचा राग
चिपळूण येथे पार पडलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाल्यानंतरही या संमेलनाशी संबंधित वाद शमण्याची चिन्हे नाहीत. या साहित्य संमेलनासाठी रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाने एकमताने मंजूर केलेला २५ लाख रुपयांचा निधी पालकमंत्री भास्कर जाधव यांनी रोखून धरला असल्याचे उघड झाले आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी जाधव यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत हा निधी एकमताने मंजूर करण्यात आला होता. पण त्यानंतर शेजारच्या रायगड जिल्ह्य़ातील जलसंपदा मंत्री सुनील तटकरे संमेलनाचे स्वागताध्यक्ष झाल्यामुळे जाधव खवळले. त्याबाबतची तीव्र नापसंती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली होती. तसेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते झालेल्या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर ते संमेलनस्थळाकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे मंडळाने मंजूर केलेल्या निधीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.  
याबाबत माहिती घेतली असता, मागील बैठकीचे इतिवृत्त अजून मंजूर व्हायचे असून त्यातील निर्णयांबाबत फेरविचार होऊ शकतो, अशी कायदेशीर तरतूद असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, कोकण विभागातील १५ आमदारांनी आपल्या निधीतून संमेलनासाठी शिफारस केलेला प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी यापूर्वीच संमेलनाच्या संयोजन समितीकडे जमा झाला आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्य़ातील ६, रत्नागिरी जिल्ह्य़ातील ३, तर मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांमधील प्रत्येकी २ आमदारांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचे शिफारस पत्र उशीरा मिळाल्यामुळे त्यांचा निधी अजून वर्ग होऊ शकलेला नाही, तर पालकमंत्री जाधव यांनी आपल्या आमदार निधीतून तशी शिफारसच केलेली नाही. त्यामुळे संमेलन समाप्त झाले असले तरी अतिरिक्त सरकारी निधीबाबतचे कवित्व शिल्लकच राहिले आहे.