जमिनींचे प्रचंड वाढलेले भाव, भाऊ-बंदकीतून प्रतिष्ठेचे केलेले विषय आणि परस्परांना अद्दल घडविण्याच्या इर्षेने चाललेला न्यायालयीन लढा.. अशा विविध कारणांस्तव शहरालगतच्या गावांमध्ये दिवाणी व महसुली स्वरूपांचे तंटे मिटता मिटत नसल्याच्या निष्कर्षांप्रत पोलीस यंत्रणा आली आहे. सामोपचाराने तंटे मिटविण्यात अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या परिसरात महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम प्रभावीपणे राबविणे अवघड ठरत असल्याचे दिसत आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्या अंतर्गत दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर स्वरूपाचे तंटे तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून मिटविता येतात. या प्रक्रियेत तंटे मिटविण्याच्या कामाला सर्वाधिक महत्त्व आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सामोपचाराने मिटविल्या जाणाऱ्या तंटय़ांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे फौजदारी स्वरूपाच्या तंटय़ांचे असून सर्वात कमी प्रमाण महसुली व दिवाणी तंटय़ांचे असल्याचे गृह विभागाच्या अहवालावरून लक्षात येते. मोहिमेच्या सुरुवातीच्या चार वर्षांत तब्बल ८ लाख ११ हजार ४१९ फौजदारी तर ३३,३९९ महसुली स्वरूपाचे तंटे मिटविण्यात यश आल्याचे गृह विभागाने म्हटले आहे. या व्यतिरिक्त दिवाणी स्वरूपाचे ६२,४५८ तर इतर स्वरूपाचे ६८,२५५ तंटे मिटले आहेत. या आकडेवारीवर नजर टाकल्यास फौजदारी वगळता महसुली व दिवाणी स्वरूपाचे तंटे मिटण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे दिसून येते. नाशिकचा विचार करता आसपासच्या गावांमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याचे दिसते.
नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण १९ गावांचा समावेश होतो. गेल्या काही वर्षांत वेगाने विस्तारणाऱ्या शहराच्या आसपासच्या जमिनींनाही अक्षरश: सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्तेचे मालकी हक्क, वारसा हक्क, हस्तांतरण या दिवाणी स्वरूपाच्या तर शेतीचे मालकी हक्क, सार्वजनिक रस्ता व शेतात जावयाचा रस्ता आदी कारणांवरून महसुली स्वरूपाचे तंटे वाढत आहेत. खरेतर हे वाद तंटामुक्त मोहिमेद्वारे मिटविता येणे शक्य असले तरी जमिनींचे वाढलेले भाव आणि वाद संपुष्टात आणण्याची मानसिकता दाखविली जात नसल्याने ते सोडविण्यात अडचणी येत असल्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. साहजिकच त्याचा परिणाम तंटामुक्तीसाठी पात्र ठरण्यावर होत आहे.
मोहिमेच्या पाच वर्षांत नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९ पैकी गंगावरे, दरी, नाईकवाडी, नागलवाडी, महादेवपूर व पिंपळगाव गरुडेश्वर ही सहा गावे आतापर्यंत तंटामुक्त झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप निकम, यशवंत शेवाळे व दत्ता आहेर यांनी दिली. शहरालगतच्या गावांमधील असे तंटे मिटविण्याकरिता प्रथम ग्रामस्थांची मानसिकता बदलावी लागणार आहे. त्याकरिता जनजागृती करावी लागणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.