हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथील प्रेमी युगलाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना आज (शनिवार) पहाटे घडली.

हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथील अविवाहित दत्ता व विवाहिता शारदा यांच्यात प्रेम संबंध होते. विशेष म्हणजे नवर्‍याशी पटत नसल्याने विवाहिता चार वर्षांपासून मामाकडेच कामारवाडी येथे वास्तव्यास होती. दरम्यान काही दिवसांपासून त्यांच्या नातेवाईकांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. शारदा विवाहीत असल्याने दत्ताच्या घरच्यांनी दोघांच्या प्रेम संबंधाला टोकाचा विरोध दर्शविला. तसेच त्याचे लग्न करण्याचे ठरवून, सोयरीकही जुळवून आणली होती. परंतु दत्ताने शारदा सोबत जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. दत्ताचे लग्न झाले तर दोघांना एकमेकांपासून दूर व्हावं लागणार असल्याने, दोघांनीही टोकाचा निर्णय घेत शनिवारी पहाटे गावाशेजारील एका शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटना उघडकीस आल्यानंतर कामारवाडी गावचे पोलीस पाटील नागोराव भिंगोरे यांनी हिमायतनगर पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व दोघांच्या मृतदेहाचे हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर कामारवाडी येथे दुपारी एकाच चित्तेवर दोघांनाही अग्नि देण्यात आला. या धक्कादायक घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे याच्या मार्गदर्शनाखाली जमादार हेमंत चोले करत आहेत. या घटनेनंतर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.