कोटय़वधी रुपयांची अपसंपदा गोळा प्रकरणातील आरोपी असणाऱ्या जिल्हाधिकारी नितीश ठाकूर यांचा जामीन रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी अलिबागच्या सत्र न्यायालयाने बुधवापर्यंत पुढे ढकलली. इडीच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करायचे असल्याने न्यायालयात हजर राहता येणार नसल्याचे ठाकूर यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितले. यानंतर या प्रकरणाची सुनावणी १० एप्रिलपर्यंत तहकूब केली.  
करोडो रुपयांची अपसंपदा गोळा केल्याच्या प्रकरणी माजी उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर यांच्यावर अलिबागच्या सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकूर हे जामिनावर असून त्यांना रायगड, ठाणे आणि मुंबई सोडून बाहेर जाण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीदेखील नितीश ठाकूर नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला मिळाली होती. ही बाब लक्षात घेऊन ठाकूर यांचा जामीन रद्द करावा आणि त्यांचा पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
 यावर सुनावणी करताना सत्र न्यायाधीश यशवंत चावरे यांनी नितीश ठाकूर यांना सोमवारी न्यायालयात हजर राहण्यास आणि पासपोर्ट जमा करण्यास सांगितले होते.
मात्र इडीच्या आणखीन एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अपील करायचे असल्याचे कारण देत नितीश ठाकूर आज न्यायालयात हजर राहू शकत नसल्याचे त्यांचे वकील प्रवीण ठाकूर यांनी न्यायालयात सांगितले. मात्र सरकारी वकील वैभव भोळे यांनी याला आक्षेप घेतला. अखेर सुनावणी १० एप्रिलपर्यंत पुढे ढकलली.