महाराष्ट्र सरकारच्या विद्युत शुल्क सवलतीचा लाभ मिळणाऱ्या राज्यातील औद्योगिक ग्राहकांना आता ऑनलाइन परतावा मिळणार आहे. ‘महावितरण’ने त्यासाठी ऑनलाइन यंत्रणा विकसित केली असून, या पद्धतीचा लाभ राज्यातील सुमारे एक लाख २५ हजार औद्योगिक ग्राहकांना मिळणार आहे. राज्य सरकारच्या २००७ च्या सार्वजनिक प्रोत्साहन योजनेत क, ड, बिगर औद्योगिक क्षेत्रातील उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग, जैवतंत्रज्ञान उद्योग, निर्यात प्रक्रिया क्षेत्रातील १०० टक्के निर्यात उत्पादन केंद्र, सेझमधील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत मिळते. आतापर्यंत याबाबतच्या परताव्यासाठी सरकारी विभागांकडून प्रत्यक्ष तपासणी होऊन मग परतावा मिळायचा. आता अशा ग्राहकांना कागदपत्रांसह ‘महावितरण’कडे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यापासून एक महिन्याच्या आत हा ऑनलाइन परतावा दिला जाईल.