सभेच्या नियोजित वेळेच्या दीड तास आधीच घनसावंगीत दाखल झालेल्या शरद पवार यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांना निवडून आणण्याच्या दृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा केली. परभणी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहा विधानसभा मतदारसंघांतील घनसावंगी व परतूर हे दोन जालना जिल्ह्य़ातील आहेत. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या विजयासाठी निर्णायक कसे ठरू शकतात, या मुद्दय़ाभोवतीच पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने बहुतेक चर्चा झाली.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश वरपुडकर पराभूत झाले, तेव्हा त्यांना सहापैकी दोन मतदारसंघांतच मताधिक्य होते. पैकी परभणी विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य ८७१ व जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी मतदारसंघातील मताधिक्य ११ हजार ८६० होते. मंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगी विधानसभा क्षेत्रात या वेळी गेल्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्य राष्ट्रवादीस कसे मिळू शकेल, याबाबत पवार यांच्या दौऱ्यानिमित्ताने चर्चा झाली. घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील १५ जि. प. सदस्यांपैकी १०-११ व पंचायत समितीत १४ पैकी १२ सदस्य शिवसेनेचे आहेत. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत सेनेचे अर्जुनराव खोतकर घनसावंगीतून राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्याकडून पराभूत झाले, तरी त्यांना जवळपास ८२ हजार मते पडली. या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे भांबळे यांना मोठे मताधिक्य घनसावंगीतून देण्यासंदर्भात मोर्चेबांधणीची चर्चा पवार यांच्या दौऱ्यात झाली.
परतूर विधानसभा क्षेत्रात मागील वेळेस शिवसेनेचे उमेदवार गणेश दुधगावकर यांना ९ हजार ४८९ मताधिक्य होते. परतूरचे सध्याचे अपक्ष आमदार सुरेशकुमार जेथलिया त्यावेळी राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरोधात व दुधगावकर यांच्या बाजूने होते. परंतु शनिवारच्या पवार यांच्या दौऱ्यात ते व्यासपीठावर उपस्थित होते. एवढेच नव्हे, तर परतूरमधील गेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत व दोन्ही बंडखोर उमेदवारही हजर होते. राष्ट्रवादीसाठी ही बाब अनुकूल मानली जाते. ‘आम्ही चौघेही आता भांबळे यांच्या पाठीशी आहोत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय ठरवायचे, ते ठरवू. परंतु लोकसभेत परतूरमधून मोठे मताधिक्य देऊ,’ असा शब्द जेथलिया यांनी पवार यांना जाहीरपणे दिला.
दुधगावकरांच्या आठवणी!
शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या खासदार गणेश दुधगावकर यांचे २५ वर्षांतील राजकीय प्रवासातील आठवणी सांगणारे भाषण या वेळी झाले. दुधगावकर म्हणाले की, आपण जुने काँग्रेसवाले आहोत. परंतु त्या पक्षाच्या चुकांमुळे शिवसेना वाढली. २५ वर्षांपूर्वी शरद पवार यांनी परभणी जिल्ह्य़ात मला पाहिजे तेथे विधानसभेचे तिकीट देण्याऐवजी दुसरीकडे दिले. पाथ्रीमध्ये उभे राहिलो तर तेथे बाबाजानी दुर्राणी यांनी सहकार्य केले नाही. घडय़ाळ व पंजा एकत्र आल्यास शिवसेना-भाजप विजयी होणार नाही! मी शिवसेना सोडून पवारसाहेबांकडे आलो. याचे कारण ते स्वाभिमानी असून राज्याचे प्रश्न सोडविणारा त्यांच्याएवढा नेता महाराष्ट्रात पुढच्या काळातही होणार नाही. पवार यांनी मला राष्ट्रवादीत येण्याची विनंती केली. त्याआधी मलाही माहीत नव्हते की आपण राष्ट्रवादीत जाणार आहोत. पवारसाहेब मला म्हणाले की, पुण्याच्या सभेत आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तुम्हाला राष्ट्रवादीत येण्याची विनंती करतील. तुमच्या सेवेची महाराष्ट्राला गरज आहे. मग मी राष्ट्रवादीत आलो.
दुधगावकर पुढे म्हणाले की, शिवसेनेचे ६ खासदार पवारांच्या दारात होते. ते आले नाहीत, परंतु मी आलो. गेल्या वेळी शिवसेनेकडून खासदार झाल्यावर मी सोनिया गांधींना भेटलो होतो आणि काँग्रेस चुकीच्या निर्णयामुळे कशी बुडत आहे, ते त्यांना सांगितले होते. पवार यांनी जेवणासाठी बोलावले, तर मला ‘मातोश्री’वरून त्यांच्या पी.ए.चा फोन आला की, जेवायला जाऊ नका, लग्नाला जाऊ नका. असा कुठे पक्षादेश असतो का? असा उलट प्रश्न आपण ‘त्या’ला विचारला. दुधगावकर यांच्या भाषणातील कोणत्याही आठवणीची किंवा मुद्दय़ाची पवार यांनी भाषणात दुरान्वयानेही दखल घेतली नाही.