मुंबई-पुण्यासह राज्यभरात प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादात सुरू असलेल्या ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग उधळून लावण्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. प्रेक्षकांच्या संतापामुळे प्रयोग उधळून लावण्यासाठी नाटय़गृहात शिरलेल्या आंदोलकांनाच ‘अंडरग्राउंड’ व्हावे लागले. येथील कालिदास कलामंदिरात शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
कालिदास कलामंदिरात ‘शिवाजी अंडरग्राउंड..’चा प्रयोग लावण्यात आला होता. प्रयोग सुरू होण्याआधीच हिंदू एकता आंदोलन, परशुराम जयंती उत्सव समिती, पुरोहित संघ या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाटय़मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आंदोलन सुरू केले. या नाटकात हिंदू देवदेवतांविषयी आक्षेपार्ह विधाने असल्याची आंदोलकांची तक्रार होती. प्रेक्षकांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत नाटय़गृहात प्रवेश केला. नाटकाचा प्रयोग नियोजित वेळेत सुरूही झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी नाटय़गृहात शिरत घोषणाबाजी सुरू केली. प्रयोग बंद पाडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु यामुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनीच आंदोलकांना फैलावर घेतले.  प्रेक्षकांची आक्रमक भूमिका पाहून आंदोलकांनी बाहेर जाऊन घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनीही हस्तक्षेप केला. संयोजकांनी आंदोलकांच्या काही प्रतिनिधींना नाटक पाहण्याची विनंती केली. त्यानंतर तीन ते चार प्रतिनिधींना नाटक पाहण्यासाठी आतमध्ये सोडण्यात आले आणि पोलीस बंदोबस्तात प्रयोग पुढे सुरू झाला.
बाह्य़ सेन्सॉरशिप नको
या नाटकास अनेक पारितोषिक मिळालेले आहेत. त्यात काही आक्षेपार्ह आहे की नाही ते आम्ही बघून ठरवू, असे सांगत प्रेक्षकांनी आंदोलकांना बाहेर जाण्यास सुनावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protesters goes in asylum to see angry spectators