मृग नक्षत्र लागूनही सर्वाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अर्धा मृग संपला तरीही अद्याप जिल्ह्यात पावसाला सुरवात झालेली नाही. मात्र गुरुवारी उस्मानाबादसह तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात मृगाच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीपाणी केले.
यंदाच्या पावसाळ्यातील मृग नक्षत्रास प्रारंभ होऊन आता दहाबारा दिवस उलटले. परंतु प्रत्यक्षात पावसाचे आगमन झालेले नाही. खरिपाच्या पेरण्यांसाठी पेरणीपूर्व मशागतींची कामे उरकून बसलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट दिसत आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक ढग एकत्र होऊन सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. उस्मानाबाद तालुक्याच्या काही भागात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. उस्मानाबाद शहराच्या काही भागात मोठा तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर तुळजापूर आणि उमरगा तालुक्यातही चांगला पाऊस झाला आहे. मृगाचा पहिला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. परंतु पेरण्यांना सुरुवात करण्यासाठी अद्याप मोठय़ा पावसाची गरज आहे.
जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. पेरणीपूर्व मशागतींची सर्व कामे उरकून बसलेल्या शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदीसुद्धा पूर्ण केली आहे. एकंदरीत पेरणीसाठी तयारीत असलेला शेतकरी पाऊस होत नसल्याने चिंतेत आहे. खरिपाच्या पेरण्या वेळेवर होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.