एका तरुण ठेकेदाराच्या सर्वागावर धारदार चाकूचे सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. त्याच्या अंगावरील सुमारे साडेचार लाखांचे सोन्याचे दागिनेही खुन्याने लांबविल्यामुळे हत्या चोरीच्या प्रकारातून झालेली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव स्वप्निल राजाराम मोरे (वय ३५, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) असे असून तो १५ मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा चुलतभाऊ संतोष मनोहर मोरे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, स्वप्निल मोरेची दुचाकी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री आढळली, तर शनिवारी सकाळी एका अज्ञात इसमाचे छिन्नविच्छिन्न प्रेत चंपक मैदान (उद्यमनगर) येथे असल्याचा दूरध्वनी शहर पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी स्वप्निलचा भाऊ संतोषने प्रेत आपल्या चुलतभावाचेच असल्याचे ओळखले. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robber killed contractor and theft ornament of rs 4 5 lakh