शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी आज पुकारलेल्या बंदला सांगलीत प्रतिसाद मिळाला. तासगावमध्ये आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १० कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देण्यास विरोध करण्यासाठी ‘संभाजी ब्रिगेड’च्या पुढाकाराने शिवसन्मान जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत आ. आव्हाड यांनी मिरज दंगलीचे सूत्रधार शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे असल्याचा आरोप केला. यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जाऊन आव्हाड यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी व्यासपीठासमोर असलेल्या ‘संभाजी ब्रिगेड’च्या कार्यकर्त्यांनी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना जोरदार मारहाण केली. या घटनेनंतर आ. आव्हाड यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली.
दरम्यान, काल रात्री ही घटना घडल्यानंतर सांगलीसह जिल्ह्यात असलेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी करीत आज ‘सांगली बंद’चे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत बाजारपेठ, दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले.
दरम्यान, तासगावमध्येही कार्यकर्त्यांनी आज बंदची हाक दिली होती. याला चांगला प्रतिसाद मिळाला. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेची िधड काढून दहन केले. आव्हाडांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्याचे व्यापारी पेठेत आवाहन केले. सावळज येथे मंगळवारी बंद पाळण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले असून तसा फलक सिध्देश्वर मंदिरानजीक लावण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसमन्वयक मकरंद देशपांडे, नगरसेविका स्वरदा केळकर, माजी उपमहापौर युवराज बावडेकर, माजी नगरसेवक पांडुरंग केरे आदींनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेऊन प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या आ. आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हेही उपस्थित होते. तत्पूर्वी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढला होता. मिरजेतही शिवाजी पुतळ्यापासून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून आ. आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी करणारे निवेदन उप अधीक्षक बजरंग बनसोडे यांना दिले.
काल रात्री घडलेल्या धुमश्चक्रीनंतर आज सांगली-मिरजेत शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात तनात करण्यात आला होता. सांगलीत चौका-चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान प्रक्षोभक वक्तव्य करून लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी आ. आव्हाड यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच संभाजी ब्रिगेडच्या १० पदाधिकाऱ्यांसह शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jul 2015 रोजी प्रकाशित
आव्हाडांच्या निषेधार्थ सांगली बंद
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी आज पुकारलेल्या बंदला सांगलीत प्रतिसाद मिळाला. तासगावमध्ये आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

First published on: 21-07-2015 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli close for jitendra awhad remonstrate