शास्त्रीय संगीताच्या विश्वात वेगळे स्थान प्रस्थापित केलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’त यंदा बुजूर्ग कलाकारांबरोबरच नव्या पिढीचा आविष्कार रसिकांना अनुभवावयास मिळणार आहे. महोत्सवाच्या हीरक महोत्सवानिमित्त रसिकांना सहा दिवसांच्या संगीत श्रवणाची मेजवानी लाभणार असून या महोत्सवाचा लोकसत्ता माध्यम प्रायोजक आहे.
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवातील सात सत्रांमध्ये ३१ कलाविष्कार सादर होणार असून ४० हून अधिक कलाकारांचा यामध्ये सहभाग आहे. महोत्सवाची तिकीट विक्री ४ डिसेंबरपासून सुरू होत असून कमला नेहरू पार्कजवळील शिरीष ट्रेडर्स, कोथरूड येथील नावडीकर म्युझिकल्स, लक्ष्मी रस्त्यावरील दिनशॉ अॅंड कंपनी आणि शनिपार येथील बेहरे बंधू आंबेवाले येथे ती उपलब्ध आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सोमवारी दिली. ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी या प्रसंगी उपस्थित होते.
महोत्सवात ११ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता पं. अनंत लाल यांचे नातू अश्विनी आणि संजीव शंकर या बंधूंचे सनईवादन होईल. मीना फातर्पेकर आणि पद्मा देशपांडे यांच्या गायनानंतर राहुल शर्मा यांचे संतूरवादन होणार आहे. संगीत मरतड पं. जसराज यांच्या गायनाने पहिल्या दिवसाची सांगता होणार आहे.
रतन मोहन शर्मा यांच्या गायनाने १२ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता दुसऱ्या दिवसाचे सत्र सुरू होईल. अयान आणि अमान अली बंगश यांचे सरोदवादन झाल्यावर प्रसिद्ध अभिनेत्री शोभना चंद्रकुमार यांचे भरतनाटय़म होईल. पं. राजन-साजन मिश्रा आणि त्यांचे पुत्र रितेश-राजनीश मिश्रा यांच्या एकत्रित मैफलीने या सत्राची सांगता होईल. १३ डिसेंबर रोजी संजीव चिमलगी आणि कलापिनी कोमकली यांचे गायन, फारुक लतिफ खान आणि सरवर हुसेन यांच्या सारंगीवादनाच्या जुगलबंदीनंतर पं. उल्हास कशाळकर आणि समीहन या पिता-पुत्राच्या गायनाची मैफल  होईल. पल्लवी पोटे यांच्या गायनानंतर १४ डिसेंबरला पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे बासरीवादन, आनंद भाटे आणि मालिनी राजूरकर यांचे गायन होईल. १५ डिसेंबरच्या सत्रात  सम्राट पंडित,आरती अंकलीकर, श्रीनिवास जोशी यांचे गायन, पं. स्वपन चौधरी यांचे एकल तबलावादन आणि उस्ताद अमजद अली खॉं यांचे सरोदवादन होणार आहे.
रविवारी (१६ डिसेंबर) सकाळी साडेआठला सुरू होणाऱ्या पहिल्या सत्रात कल्पना झोकरकर आणि विजय कोपरकर यांचे गायन, तर पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन होणार आहे. अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांच्या गायनाची मैफल सायंकाळी चार वाजता होईल. त्यानंतर शौनक अभिषेकी, उपेंद्र भट आणि परमेश्वर हेगडे यांचे गायन,तर पं. अतुलकुमार उपाध्ये आणि उस्ताद शाहीद परवेझ यांची व्हायोलिन अणि सतारवादनाची जुगलबंदी होणार आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने यंदाच्या महोत्सवाची सांगता होणार आहे.
संकेतस्थळ विकसित
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे sawaigandharvabhimsenmahotsav.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. त्यावरही या कार्यक्रमांची माहिती रसिकांना पाहता येईल.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savi gandharv bhimsen mohotsav this year not only senior but also youngers will participating