स्वतंत्र तेलंगणची निर्मिती दृष्टिपथात असताना वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी चळवळ चालविणाऱ्या पहिल्या फळीतील राजकीय दिग्गजांनी नांगी टाकली असली तरी दुसऱ्या फळीतील नेत्यांनी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्याच्या उद्देशाने येत्या ५ ऑगस्टला नवी दिल्लीत संसद भवनाला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशात तेलंगणचा मुद्दा पेटला असताना विदर्भवाद्यांचे ज्येष्ठ नेते जांबुवंतराव धोटे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
फॉरवर्ड ब्लॉकमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी हा मुद्दा हाती घेण्याचे सूतोवाच केले होते. परंतु, एकाच भूमिकेवर ठाम न राहिल्याने त्यांच्या एकेकाळच्या जुन्या समर्थकांनीही त्यांच्यापासून अंग झटकले आहे. या पाश्र्वभूमीवर आंदोलनातील धग कायम ठेवण्यासाठी विदर्भ संयुक्त कृती समिती रविवारी अचानक सक्रिय झाली. परंतु, प्रत्यक्षात आंदोलनाला मिळालेल्या क्षीण प्रतिसादाने त्यांचाही उत्साह मावळला आहे.
जुन्या विदर्भवादी नेत्यांच्या अनुपस्थितीत विदर्भ संयुक्त कृती समितीला अचानक जाग आली असून, यात माजी आमदार वामनराव चटप यांच्या स्वतंत्र भारत पक्षाचे आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
विदर्भ आंदोलनाच्या दुसऱ्या फळीतील राम नेवले, दीपक नीलावार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, अॅड. नंदा पराते, राजकुमार तिरपुडे, अजय संघी, डॉ. गोविंद वर्मा, उपेंद्र शेंडे यांनी चळवळ जिवंत असल्याचे दाखवून देण्यासाठी नवी दिल्लीतच धडक देण्याची योजना आखली असून सामूहिक उपोषणाचाही इशारा दिला आहे.
स्वतंत्र विदर्भाची मागणी गेल्या ६० वर्षांपासून केली जात आहे. यासाठी ब्रिजलाल बियाणी, लोकनायक बापूसाहेब अणे यांच्यापासून ते जांबुवंतराव धोटे यांच्यापर्यंतच्या फळीने वेळोवेळी आंदोलने केली. धोटेंच्या आंदोलनांना वगळता अन्य नेत्यांच्या एकाही आंदोलनाला विदर्भातील जनतेने भीक घातलेली नाही. त्यामुळे एकेकाळी चळवळीत हिरिरीने भाग घेणाऱ्या रणजित देशमुख, विलास मुत्तेमवार, मधुकरराव किंमतकर, नितीन गडकरी, दत्ता मेघे, देवेंद्र फडणवीस या सक्रिय राजकीय नेत्यांनी आता मौन बाळगले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2013 रोजी प्रकाशित
विदर्भ राज्यासाठी आंदोलनात दुसऱ्या फळीतील नेते सक्रिय
स्वतंत्र तेलंगणची निर्मिती दृष्टिपथात असताना वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी चळवळ चालविणाऱ्या पहिल्या फळीतील राजकीय दिग्गजांनी नांगी टाकली असली तरी दुसऱ्या फळीतील नेत्यांनी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्याच्या उद्देशाने येत्या ५ ऑगस्टला नवी दिल्लीत संसद भवनाला घेराव
First published on: 31-07-2013 at 03:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second catagory leader active for the movement vidharba state