देवळा तालुक्यातील लोहोणेर शिवारात शेतातील झापास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत ७५ वर्षीय वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला. डोके शिवारातील मुकुंद दत्तात्रय मेतकर यांच्या शेतात ही घटना घडली. झापास लागलेल्या आगीत किका रावण माळी (७५) यांचा मृत्यू झाला. या झापात मेतकर यांचा सालदार धाकू गायकवाड हा कुटुंबीय व अपंग सासरे भिका माळी यांच्यासह राहत होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास लगतच्या शेतात काम सुरू असल्याने माळी हे एकटेच झापात होते. लकवा आजाराने ग्रस्त असल्याने आग लागल्यावर त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेनंतर नायब तहसीलदार पी. एम. गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.