टाटा पॉवरच्या प्रकल्पाविरोधात शहापूरच्या शेतक ऱ्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. टाटा पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी शासनाचे नियम धाब्यावर बसवून भूसंपादन प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप शेतक ऱ्यांनी केला आहे. पाच वर्षे नेटाने लढा देऊनही राज्यसरकारने शेतक ऱ्यांच्या विरोधाची दखल घेतली नाही. दुसरीकडे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया तशीच पुढे सुरू ठेवली. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयात त्यांना फारसे यश आले नसल्याने शहापुरच्या शेतकऱ्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शहापूर येथील प्रवीण भगत आणि आत्माराम पाटील या दोन शेतक ऱ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ही भूसंपादन प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. न्यायालयाने भूसंपादन प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन झाल्याचे तत्त्वत: मान्य करून याचिका दाखल करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.  या प्रकरणी ११ जानेवारीला न्यायालयात याचिका दाखल करून घेतानाच जिल्हाधिकारी, एमआयडीसी, पुनर्वसन विभाग, भूसंपादन विभाग आणि टाटा पॉवरला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले आहे. आठ आठवडय़ांच्या आत आपले म्हणणे दाखल करण्याच्या सूचना सर्व विभागांना करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.