राज्यातील वृत्तपत्र लेखकांची साहित्यिक अभिरुची जपून समाजातील साहित्य क्षेत्रातील नवोदित व उपेक्षितांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशनचे चौथे तीन दिवसांचे राज्यपातळीवरील शब्द साहित्य संमेलन अलिबागमध्ये ५ ते ७ एप्रिलला आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव प्रभाकर वानखेडे यांनी दिली.
वृत्तपत्र लेखक असोसिएशनतर्फे वर्धा, पुणे आणि गेल्यावर्षी नागपूरमध्ये आयोजित संमेलने यशस्वी झाल्यानंतर चौथ्या संमेलनाची अलिबागमध्ये तयारी सुरू झाली आहे.
संमेलन अध्यक्षपदी प्रा. अशोक थोरात, गझलनवाज भीमराव पांचाळे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची निवड करण्यात आली होती. चौथ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक अरुण म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.
या संमेलनाला राज्यातील नामवंत साहित्यिक, गझलकार, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार उपस्थित राहणार आहे.
गेल्या वर्षी नागपूरमध्ये या संमेलनाचे यशस्वी आयोजन करून अनेक नवोदित लेखक आणि कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.
पुस्तक प्रकाशन समारंभ, ग्रंथ प्रदर्शन, साहित्य संबंधित विविध विषयांवर परिसंवाद, कवी संमेलन, गजल मुशायरा, फेसबुक पुरस्कार वितरण, वेबसाईटचे लोकार्पण, चर्चासत्र, प्रकट मुलाखत, साहित्यिकांचा सत्कार, साहित्य क्षेत्रात महिलांचे योगदान आदी विषयांवर चर्चा होणार आहे. या संमेलनात ज्या साहित्यिकांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी ९८६०२५१३६८, ९४०३६२८०३२ या क्रमांकावर संघटनेचे अध्यक्ष संजय सिंगलवार आणि प्रभाकर वानखेडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.